लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यापासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छाती, मान आणि शरीराच्या अन्य भागात वेदना तसेच स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असल्याने शनिवारी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. तथापि, एमआरआय स्कॅन करतेवेळीचे त्यांचे फोटो समोर आल्यामुळे मात्र त्यांना सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. नवनीत राणा यांच्या कार्यालयानेच हे फोटो शेअर केल्यामुळे त्या ट्रोल झाल्यात.
वास्तविक, एमआरआय स्कॅनिंग रुममध्ये रुग्णाशिवाय अन्य कोणाला परवानगी नाही, महत्त्वाचे म्हणजे कॅमेरा, मोबाइल अशा इलेक्ट्रॉनिक उपरकरणांनाही मनाई असते. अशात, वृत्तसंस्था एएनआयने राणा यांचे एमआरआय करतेवेळीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. तसेच हे फोटो खासदाराच्या कार्यालयाकडून शेअर केल्याचेही वृत्तसंस्थेने स्पष्ट केले. यावरून नेटकऱ्यांनी राणा यांना धारेवर धरले. तसेच लीलावती हॉस्पिटलही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.
नर्सच्या जागी कॅमेरामन बसवलाय का?‘एमआरआय कक्षात मोबाइल किंवा कॅमेरा कसा पोहोचतो?, हॉस्पिटलमध्ये नर्सच्या जागी कॅमेरामन बसवलाय वाटतं, हे सुरक्षा मानकांचे उल्लंघन नाही का? लीलावती हॉस्पिटल लॅबच्या आतमध्येही फोटो काढण्यास परवानगी देते का?’ अशा प्रश्नांची सरबत्तीच नेटकऱ्यांकडून होत आहे. #ड्रामाअलर्ट, #नौटंकी, #नौटंकीबाज, #बंटीबबली असे हॅशटॅग्स वापरत नेटकरी, ‘तुम्ही जर एमआरआय मशीनपर्यंत कॅमेरा घेऊन जात असाल आणि चेहरा कॅमेऱ्यात यावा यासाठी धडपड करीत असाल तर तुमची नाटकं फक्त प्रसिद्धीसाठी चालू आहे, असे अनेक ट्विट आणि पोस्टस् करीत राणा यांच्यावर टीकेचा भडिमार करीत आहेत.