फलटण (जि. सातारा) : ‘साखरवाडी येथील सभेत राज्याचे एक मंत्री आले होते. त्यांनी रामराजे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, रामराजे यांना मी तिकीट दिले. खरं तर गंमतच आहे. पक्षाचा अध्यक्ष मी असताना यांनी कसे तिकीट दिले. आमचे नशीब चांगले म्हणून ते म्हणाले नाहीत पवार साहेबांनादेखील आम्हीच तिकीट दिले,’ अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांचा समाचार घेतला.
फलटण येथील सभेत शरद पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीवेळी भाजप व मोदींनी चारशे पार जाण्याचा घाट घातला. सत्तेसाठी आवश्यक असणाऱ्या सदस्य संख्येपेक्षा जास्त सदस्य संख्या मोदींना हवी होती. कारण डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी तयार केलेली राज्यघटना त्यांना बदलायची होती. त्यावेळी सोनिया गांधी व मित्र पक्ष आम्ही एकत्र येऊन लोकांना हा डाव समजून सांगितला. मोदी व भाजप यांना रोखले, याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानले पाहिजेत.’
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नसल्यामुळे आत्महत्या करमाळा (जि. सोलापूर) : भाजपच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळे दोन वर्षांत राज्यात तब्बल वीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली.
करमाळा आणि टेंभुर्णी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले जात आहेत. मात्र, राज्यातील ६४ हजार पीडित महिला, मुली बेपत्ता आहेत त्यांचा शोध नाही. ६७ हजार ३८१ महिला, मुलींवर अत्याचार झालेले आहेत.