दिल्लीत सुरू झालेल्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकत्र आले. मोदींनी शरद पवारांच्या दिलेल्या सन्मानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक सवाल केला आहे. 'भटकती आत्माच्या बाजूला पंतप्रधान कसे बसले?', असे राऊत म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकत्र आल्याच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "एकतर शरद पवार हे मोदींपेक्षा वरिष्ठ आहेत. पंतप्रधानांच्या खुर्चीवर कोणी बसला म्हणजे, तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही."
'शरद पवार भटकती आत्मा आहे ना?'
"साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की, मोदी त्यांच्या बाजूला बसणार नाहीत. भटकती आत्माच्या बाजूला पंतप्रधान कसे काय बसतील? त्यांना पंतप्रधान कार्यालयाने त्यांना कसं काय बसू दिलं? भटकती आत्मा आहे ना?", असा टोला राऊतांनी मोदींना लगावला.
"तुम्ही जे म्हणताय ना, आदर-सन्मान... हा एक व्यापार आणि ढोंग असतं. तेवढ्यापुरतं! आता मोदींना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल फार आदर, सन्मान, मान आहे. असे ते नेहमी भाषणात सांगतात. पण, बाळासाहेबांची निर्मिती असलेली शिवसेना त्यांनी निर्दयीपणे फोडली ना?", अशी टीका राऊतांनी केली.
शरद पवारांचा पक्ष मोदींंनीच फोडला ना, मग कसला आदर?
"शरद पवारांनी कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला ना. मग कसला आदर, सन्मान आणि मान? देखल्या देवा दंडवत अशी म्हण आहे मराठीमध्ये. आम्हाला माहितीये सगळं, काय असतं आणि काय नाही", अशी टीका राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केली.