सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा बँक, राज्य बँक, महानंद, साखर कारखान्यात केलेल्या घोटाळ्यांचे ट्रॅक्टरभर पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेत्यांनी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला होता. आता सत्तेवर आल्यानंतर ते पुरावे कुठे गेले, का त्याची रद्दी घातली, असा सवाल करीत राज्यात विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. भाजपा आयतेच सत्तेवर आले असून, त्यांना सहकारातील कालचे दरोडेखोर आता मित्र वाटू लागले आहेत, अशी खरमरीत टीका खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी सांगलीत केली. ‘एफआरपी’साठी सोमवारपासून राज्यभर सहकारमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाचे रणशिंगही फुंकले. स्वाभिमानी संघटनेच्यावतीने रविवारी येथे झालेल्या साखर परिषदेत ते बोलत होते. खा. शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या अटीवर भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता; पण आमचा भ्रमनिरास झाल्याचे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पैशावर उभे राहिलेले ‘वसंतदादा शुगर’ हे शरद पवार यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे वृद्धाश्रम झाले आहे. या इन्स्टिट्यूटचा शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. उलट तेथील शास्त्रज्ञांनी उसाच्या विविध जातींना विरोधच केला आहे. लोकरी माव्यावर प्रतिबंध घालण्यास या शास्त्रज्ञांना का अपयश आले, याचे उत्तर पवारांनी द्यावे. पुढील १० वर्षांतील साखर उद्योगाच्या रोडमॅपचे नियोजन केले; पण त्यात शेतकरी, शेतमजूर, साखर कामगारांना स्थान नव्हते. शरद पवार कृषिमंत्री असताना सहकारी कारखाने खासगी झाले. तेव्हा त्यांनी हे कारखाने वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. भाजपाने एफआरपीच्या नादी लागू नये, त्यांची गाठ शेतकऱ्यांशी आहे, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
कालचे दरोडेखोर आजचे मित्र कसे?
By admin | Published: May 05, 2015 1:12 AM