लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच सर्व पंचनामे होतील. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मिळणारी मदत कमी असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. दरड प्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात. प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधीची मागणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
केवळ दोन मंत्र्यांचे सरकार सध्या राज्याचा कारभार हाकत आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता सरकार चांगले चालले आहे की नाही, असा थेट सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आम्ही शेतकऱ्यांना केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्याची योजना थांबली होती. आम्ही ती योजना पुन्हा कार्यान्वित केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचे धोरण स्वीकारले. छोट्या सिंचन योजनांच्या वीजबिलात प्रतियुनिट एक रुपया आकारणी कमी केली. आम्ही खूप काम करतोय आणि लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ईडीने संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी जप्त केलेल्या पाकिटावर तुमचे नाव होते, याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी हे पैसे कुणाच्या घरात सापडले? माझ्या घरी सापडले का? त्यावर कोण लिहू शकतो? मी लिहिणार का? असे प्रतिप्रश्न करत तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा, असा खुलासा केला.