मुंबई : गणेशोत्सव, मोहरम व शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमध्ये स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन आणि नियोजन नेमके कसे करावे, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन आणि मुखाध्यापक, शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १ ते १५ सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. मात्र, या संदर्भातील सूचना शाळांना ३० आॅगस्ट रोजी पोहोचली असून, पुढील आठवड्यात सुट्ट्यांचा मोसम असल्याने उपक्रम राबविण्याबाबत शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर प्रश्नचिन्ह आहे.
राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छता पंधरवड्याच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षकांना स्वच्छतेची शपथ देण्यात येईल. शाळा, शाळांचा परिसर आणि घरांमध्ये स्वच्छता व स्वच्छतेचे महत्त्व याबाबत जागृती करून, स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या स्वच्छता पंधरवड्याला विरोध नाही, पण या संदर्भातील ढिसाळ नियोजनाला विरोध असल्याची नाराजी शिक्षक व मुखाध्यापकांत आहे.
१ सप्टेंबर रविवार व २ सप्टेंबरला महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आहे. अनेक शैक्षणिक संस्थांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मोहरम व अनंत चतुर्दशीला सुट्टी आहे. स्वच्छता अभियान राबविणे आवश्यकच आहे, परंतु नियोजन करताना अपुरा अवधी का? शिक्षण विभागाकडून असे परिपत्रक उशिरा का काढण्या येते? परिपत्रक काढताना स्थानिक सण, उत्सव या गोष्टींचा विचारही करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली.शाळांसाठी काय आहेत सूचना?च्सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी या पंधरवड्यातील पहिल्याच आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ किंवा पालक आणि शिक्षकांमध्ये या उद्देशासाठी बैठका आयोजित करणे अपेक्षित आहे.च्शिक्षकांनी शाळांतील, शैक्षणिक संस्थांमधील स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी करावी. आवश्यकता भासल्यास अशा सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रस्ताव योजना तयार करावी, तसेच या विषयावर विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, असे शालेय शिक्षण विभागाच्या यासंबंधीच्या निर्णयात नमूद आहे. शाळा व शिक्षण संस्थांमध्ये या पंधरवड्यात राबविण्यात आलेले विविध उपक्रम दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावेत, असे शालेय शिक्षण विभागाच्या यासंबंधीच्या सूचनांमध्ये म्हटले आहे.
मोडके फर्निचर, जुन्या फायली फेकाच्अनेक शाळा व शैक्षणिक संस्थांच्या संकुलात अडगळ ठरत असलेल्या जुन्या अभिलेखांची नोंदणी करून अनावश्यक असलेली कागदपत्रे काढून टाकावीत. नियमानुसार जुन्या फायलींचे दप्तरही कमी करण्याचा प्रयत्न करावा अथवा गरज नसेल तर निष्कासित करावे, शाळा अथवा शाळेच्या आवारात, शैक्षणिक संस्थेतील सर्व टाकाऊ सामान निष्कासित करावे.च्मोडके फर्निचर, निरुपयोगी उपकरणे आणि नादुरुस्त वाहने नियमानुसार मोडीत काढावीत, ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी जागृती निर्माण करण्याचे कामही या पंधरवड्यात करावे, असे सांगण्यात आले आहे.