(स्थळ : वधू-वर सूचक केंद्र. प्रत्येक मुलात काही ना काही दोष काढण्याची सवय लागलेल्या कुटुंबाची चर्चा.)
वडील : (एका फोटोवर बोट ठेवत) हा मुलगा बघा. दिसायला चांगला वाटतोय; पण काय करतोय?
केंद्रचालक : स्वत:चं सोन्या-चांदीचं शोरूम आहे.
आई : (चेहरा वेंगाडून) ईùù माङया लेकीला व्यापारी नको गं बाई. बिझनेस काय, आज आहे तर उद्या नाही.
केंद्रचालक : (दुसरा अल्बम पुढं सरकवत) मग यात बघा. सरकारी नोकरी आहे मुलाला. घरात तीन भाऊ अन् दोन बहिणी. गावातल्या वाडय़ात मोठं कुटुंब.
मुलगी : (अंगावर पाल पडल्यागत दचकून) शीùù मी नाही बाई जाईंट फॅमिलीत राहणार. अन् गावाकडचं गावंढळ लाईफ मला नाही आवडत. मला किùùनई पुण्यात राहणारा नोकरीवाला मुलगा हवा. त्याचं घर गावाकडं असलं तरी पण स्वतंत्र प्लॅटमध्ये आम्हा दोघांचाच संसार हवा.
वडील : मग हा बघ. डॉक्टर दिसतोय; चांगलं इन्कम असणार.
आई : (फोटो न्याहाळत) पण, त्याचं नाक कसं फेंदारलंय. माङया नाजूक मुलीला कस्सा स्मार्ट नवरा हवा .
केंद्रचालक : (हातातला अल्बम काढून घेत) पण, या डॉक्टरला बायकोही डॉक्टरच हवीय. तिसरा अल्बम बघा.
वडील : माङया मुलीच्या शिक्षणाचा इश्यू नको. लग्नात वाट्टेल ते द्यायला तयार आहोत आम्ही. हा दाखवा फोटो. गळ्यात सोन्याचा गोफ अन् हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या अंगठय़ा दिसताहेत. खानदानी दिसतोय.
केंद्रचालक : होय. खूप मोठं घराणं. चाळीस-पन्नास एकर शेती. वडील शिक्षणसम्राट. काका साखरसम्राट. भाऊ दूधसम्राट. कोटय़वधीची इस्टेट कुजत पडलीय यांची.
मुलगी : (हळूच कौतुकानं ) पण, हे करतात काय ?
केंद्रचालक : राजकारणात उतरलाय मुलगा. यंदा निवडणुकीला उभारतोय. दोन-पाच ‘खोकी’ फुटल्या तरी हरकत नाही; पण आमदार व्हायचंय म्हणतोय. सांगा. चांगल स्थळ मिळतंय बघा मुलीला.
वडील : (घाईघाईनं नकारार्थी मान हलवत) छे. छे. सुरी सोन्याची म्हणून थोडीच पोटात खुपसून घ्यायचीय? पाच वर्षे कमविलेला पैसा निवडणुकीत घालवायला वेळ किती लागतो?
आई : (शेवटच्या फोटोवर बोट ठेवत) हा कोण? दिसायला साधाच; पण डोळे हुशार वाटतात.
केंद्रचालक : (जास्त इंटरेस्ट न दाखवता) हा एक साधा कार्यकर्ता. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. स्वत:चं घरही नाही. आज या पक्षात असतो, तर उद्या त्या पार्टीत.
मुलगी : (डोळे फडफडवत) पण, नेमका काय करतो?
केंद्रचालक : (खांदे उचकवत) काहीच माहीत नाही बुवा. फक्त दर निवडणुकीला उमेदवारीचा फॉर्म भरतो. शेवटच्याक्षणी अर्ज माघारी घेऊन कुणाला तरी पाठिंबा देतो. बाकी त्याचं उत्पन्न काय, मला नाही माहीत.
आई-वडील : (उत्साहानं) येùùस. काहीच कष्ट न करता ‘भरपूर कमावणारा’ मुलगा आम्हाला पसंत.
मुलगी : होय. होय. मला आयुष्यभर सुखात ठेवण्याची क्षमता फक्त याच्यातच. हा कधीùùच ठेवणार नाही मला उपाशी ! तेव्हा लग्न करेन तर याच्याशीच !!
- सचिन जवळकोटे