राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 03:23 PM2024-09-16T15:23:53+5:302024-09-16T15:25:01+5:30
राज्यात काय वातावरण आहे, किती जागा लढायच्या, अजित पवारांना सोबत घेतले तर लोकसभेसारखा फटका बसेल का, असे अनेक प्रश्न भाजपश्रेष्ठींना सतावत आहेत.
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. इकडे तीन विरुद्ध तिकडे तीन अशी लढत होणार की महायुती आणि मविआतील पक्ष फुटणार इथपर्यंत सारी अनिश्चितता आहे. महायुतीत अजित पवार सोबत नको असे वारे सुरु आहेत. तर मविआत जागावाटप सुरु झाले आहे. अशातच भाजपला काही केल्या महाराष्ट्राच्या जमिनीचा कस लागत नाहीय, असे संकेत मिळत आहेत.
राज्यात काय वातावरण आहे, किती जागा लढायच्या, अजित पवारांना सोबत घेतले तर लोकसभेसारखा फटका बसेल का, असे अनेक प्रश्न भाजपश्रेष्ठींना सतावत आहेत. यामुळे महाराष्ट्रातून काय फीडबॅक येतोय, याची वारंवार भाजपाकडून चाचपणी केली जात आहे. यामुळे भाजपा अनेक नेत्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात याचीच चाचपणी करण्यासाठी पाठवत आहे. महाराष्ट्रातील सरकार एवढ्या खटपटी करून पुन्हा मिळविलेले असताना भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.
यातूनच भाजपा दुसऱ्या राज्यातील नेत्यांना, केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात पाठवत आहे. भाजपच्या वेगवेगळ्या राज्यांतील नेत्यांवर तसेच महाराष्ट्रातील नेत्यांवर विविध विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना या जागांच्या दौऱ्यावर पाठविण्यात आले होते. या नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत या चाचपणीचा अहवाल दिला आहे.
लोकसभेला गारद झाल्यानंतर सावध झालेल्या भाजपा गेल्या काही महिन्यांपासून राज्यातून वारंवार माहिती घेत आहे. उत्तर प्रदेश, गुजरातच्या नेत्यांना पाठविले जात आहे. यानुसार भाजपा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविणार आहे. तसेच पुढील रणनिती ठरविणार आहे.
तसेच उमेदवार कोण असेल हे देखील ठरविले जाणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतच लोकसभेला मदत केलेल्या, सोबत असलेल्या छोट्या पक्षांनाही जागा द्यायच्या आहेत. यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला महायुतीत वादळ आणण्याची शक्यता असून भाजपसमोर हे एक आव्हान ठरणार आहे.