अभिनव पवार
सातारा - 'मुलगी झाली हो' च्या चित्रीकरणावरून गुळुंब ग्रामपंचायतीने पाठवलेले पत्र नक्की कोणाच्या आदेशाने पाठवले याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य देखील अनभिज्ञ आहेत. वास्तविक गुळुंब गावच्या ग्रामपंचायतीने सरपंच यांचे स्वाक्षरीने काढलेले सदर पत्र पाठवले असले तरी याबाबत बहुतांश ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती. सदर पत्र हे ग्रामपंचायतीच्या कोणत्याही ठरावाशिवाय अगर प्रस्तावाशिवाय पाठवण्यात आल्याने याबाबतचे गौडबंगाल नक्की काय आहे याची शहानिशा होत नाही.
याबाबत गुळुंब येथील सरपंच स्वाती माने यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. तसेच ग्रामपंचायतीला चित्रीकरणाच्या निमित्ताने गावाला आर्थिक मदत होत असताना अचानकपणे हे पत्र पाठवले जाते म्हणजे याच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. गुळुंब ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मयुरेश्वर येथे या मालिकेचा सेट उभारण्यात आला असून येथील स्थानिकांना देखील यानिमित्ताने रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र एका पत्रामुळे येथे खळबळ उडाली आहे. हे पत्र नेमके कोणी बनवले व कोणी व्हायरल केले, याबाबतची माहिती अजूनही उघड झाली नाही.
मालिकेच्या सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता किरण माने यांना मालिकेतून बाहेर काढण्याचे कारण हे राजकीय नसून त्यांचा स्वभाव आहे. मात्र याबाबत संपूर्ण राज्यात मतभेद आहेत. मुळातच या मालिकेच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी आधीच ग्रामपंचायतीची रितसर परवानगी घेतली होती. परंतु अचानकपणे ही परवानगी नाकारण्याचे पत्र नेमके कोणी व कशासाठी दिले याबाबत अनेक शंका निर्माण होत आहेत.
‘त्या’ पत्रात काय होतं?
अभिनेता किरण माने प्रकरणात गुळुंब ग्रामपंचायतीने नोटीस बजावून पॅनोरमा एंटरटेनमेंट प्रा. लि. या संस्थेला १५ जानेवारी २०२२ पासून गुळुंब ग्रामपंचायतीच्या हद्दीत मालिकेचे चित्रीकरण करण्यास दिलेली परवानगी रद्द करून चित्रीकरण थांबवण्यास सूचना केली. राजकीय भूमिका मांडणाऱ्या एका मराठी कलावंताला घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर केला म्हणून मालिकेतून काढून टाकणं हे घटनेविरोधी आहे,’ असे मत गुळुंब ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती माने यांनी व्यक्त केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या संपूर्ण टीमने महाराष्ट्रात शिवशंभू, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी लोकशाही नांदते, हे विसरू नये, असा सल्लादेखील या पत्राद्वारे देण्यात आला. तसेच, मनुवादी विचारसरणीच्या वाहिनी व ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या गुळुंब गावात होत असलेल्या चित्रीकरणासाठी गुळुंब ग्रामपंचायत मान्यता नाकारत असून अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या गुळुंब गावच्या हद्दीत प्रवेश नाही, अशीही स्पष्टोक्ती सरपंच स्वाती माने यांनी केली होती.