Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvan: मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीसह महायुतीमधील नेत्यांनी मालवण येथे जाऊन भेटी दिल्या. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे गट आमनेसामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले. यासंदर्भात एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आता आपला अहवाल सादर केला आहे. चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातून काही धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मालवण सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला. यानंतर मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे यालाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला १६ पानी अहवाल सादर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना, त्याचे डिझाइन योग्य पद्धतीने करण्यात आलेले नव्हते, याचा उल्लेख या अहवालात आहे.
अनेक ठिकाणी चुका, पुतळा कोसळल्याचे मुख्य कारण समोर
भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता. अनेक ठिकाणी चुका होत्या. तसेच शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे मुख्य कारण या समितीने अहवालात नमूद केले आहे. गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असे अहवालात म्हटले आहे.
छत्रपती शिवरायांचा पुतळा नेमका कसा कोसळला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही, हे मुख्य कारण समोर आले आहे. देखभाल योग्य पद्धतीने झाली नाही, त्यामुळे पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता. यामध्ये प्रामुख्याने पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला होता, चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग या पुतळ्याचा करण्यात आले होते. ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यात आला होता. त्याचे डिझाइन योग्य पद्धतीने करण्यात आले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे हा अहवाल देण्यात आला असून, यातील प्रमुख कारण आता समोर येत आहे. पुतळा पडण्याची अनेक कारण या तज्ज्ञ मंडळींनी नमूद केली आहेत, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा ६० फूट उंच तलवारधारी पुतळा राज्य शासन उभारणार आहे. पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महिनाभरातच सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. काम पूर्ण करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. कामात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी राज्य शासनाने ५०० पेक्षा जास्त पानांचे निकष असणारी निविदा प्रसिद्ध केली आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आयुर्मान सुमारे १०० वर्षे इतके असणार आहे. १० वर्षे या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती त्या ठेकेदाराने करायची आहे. इच्छूक शिल्पकारांना ३ ऑक्टोबरपर्यंत शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याचे ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल सादर करावे लागेल. त्यानंतर ४ ऑक्टोबरला सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड होईल.