मुंबई: शालेय पाठ्यपुस्तकांसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचा निर्णय मागे घेत शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात थेट पुस्तके मिळणार असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयाला काही दिवस उलटले असले तरीही गोंधळ कमी झालेला नाही. मुंबईतील काही महापालिका शाळांमध्ये बँक खाते उघडण्यासाठी शाळेत कागदपत्रे जमा करण्याचे फलक झळकत असल्याने विद्यार्थी- पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शाळेत लावलेल्या फलकांमुळे शिक्षकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत आणि थेट त्यांच्या हातात दिली जात होती. तथापि, राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचे पैसे यापुढे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील असे फर्मान काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढले होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण, शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला अनेक स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर एकूण परिस्थितीचा विचार करुन तावडे यांनी या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले होते. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके ही त्यांना थेट त्यांच्या हातातच देण्यात येणार आहेत. त्यासाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार नाहीत. पण, या पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त लागणाऱ्या अन्य पुस्तकांचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होत. या स्पष्टीकरणानंतर शिक्षक आणि मुख्याध्यापक निर्धास्त झाले होते. पण, काही महापालिका शाळांत पाठ्यपुस्तकांच्या पैशासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याचे फलक लागल्याने पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला असून हा विषय चर्चेत आला आहे. तावडे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या निर्णयाचे कोणत्याही प्रकारचे परिपत्रक काढण्यात आलेले नाही. त्यामुळे शाळांनी बँक खाती उघडण्याचे सत्र सुरु केले आहे. शाळांकडे लेखी स्वरुपात काहीच नसल्याने बँक खाते उघडावे लागणार असे शाळांचे मत आहे. पण, या प्रकारात काही शाळांनी शिक्षण विभागावरच टीका केली आहे. सुरु असलेल्या गोंधळ सुटण्यासाठी शिक्षण विभाग आता कोणती घोषणा करेल आणि कधी करेल याकडे शाळांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
नक्की पुस्तके मिळणार कशी?
By admin | Published: February 06, 2017 2:36 AM