मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमधील संघर्ष वाढत चालला असून विमान प्रवासावरून आज पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. खासगी कार्यक्रमासाठी सरकारी विमान कसे वापरता येईल, असे शिवसेनेने म्हटले आहे, तर ‘आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो?’ असा सवाल राज्यपालांनी केला.राज्यपालांना सरकारी विमान नाकारल्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, मला त्याची कल्पना नाही. सकाळपासून मी जनता दरबारात आहे. नेमके काय झाले याची माहिती घेऊन सांगतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यपालांना विमान प्रवास नाकारण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नेमतात. राज्यपालांना कुठे जायचे असेल तर ते सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहितात, त्यानंतर विभागाकडून आदेश काढला जातो. राज्यपालांकडून आजच्या प्रवासाबाबत आधीच पत्र पाठविले होते. मुख्यमंत्र्यांपर्यंतही हे पत्र पोहोचले; तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके अहंकारी सरकार मी पाहिले नव्हते. आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळाले पाहिजे, अशी टीका फडणवीस यांनी केली. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी १२ नावे राज्यपालांकडे पाठवली, ती मंजूर केली नाहीत याबद्दल आम्ही बोललो तर भाजपने आघाडीच्या नावाने बोंब करणे चुकीचे आहे. बाकी मुख्यमंत्री आणि राज्यपाल कार्यालय ओपन माइंडेड आहेत, त्यामुळे षडयंत्र वगैरै काही बोलू नका.
आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा?; राज्यपालांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 2:51 AM