मुंबई- सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला अर्ज परत घेतला. याबाबत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली. त्यानंतर, मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत राज ठाकरेंच्या शब्दाचे महत्व अधोरेखित केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वप्रथम पत्र लिहून भाजपला अंधेरीतील पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्वायी, अशी विनंती केली होती. त्यानंतर, शरद पवारांचे आवाहन आणि प्रताप सरनाईक यांचे पत्र, त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये तातडीच्या बैठका झाल्या आणि अखेर शिवसेना उमेदवार ऋुतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्रभाजपच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी भाजपला आणखी एक पत्र लिहिले. ते म्हणाले, " प्रिय मित्र देवेंद्रजी, जय महाराष्ट्र... काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात, ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार." अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिले आहे.
राज ठाकरे राज्याच्या हिताची भूमिका घेतात - बावनकुळेराज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपनेही निर्णय घेतल्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चा आणखी घट्ट झाल्या आहेत. मात्र, त्यावर, बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात. मात्र, भाजपचा हा निर्णय म्हणजे मनसे-भाजपच्या युतीची नांदी नाही. राज ठाकरे व शरद पवार यांनी घेतलेली भूमिका हा वेगळा भाग होता. शीर्षस्थ नेतृत्वाने हा निर्णय घेतला. अशा प्रकरणात संवेदनशीलता दाखविणे आवश्यक आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले.