अजित पवारांचेच श्रेय कसे? बैठकीत शिंदेसेनेचे मंत्री संतप्त; फडणवीस यांची मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 09:24 AM2024-09-06T09:24:50+5:302024-09-06T09:26:17+5:30

Mahayuti News: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा प्रचार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो न वापरणे, योजनेच्या नावातून ‘मुख्यमंत्री’ हा शब्दच गायब करणे असे अजित पवार गटाकडून केले जात असल्याची तक्रार करत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

How is the credit of Ajit Pawar? Shindesena ministers angry at meeting; Fadnavis' mediation | अजित पवारांचेच श्रेय कसे? बैठकीत शिंदेसेनेचे मंत्री संतप्त; फडणवीस यांची मध्यस्थी

अजित पवारांचेच श्रेय कसे? बैठकीत शिंदेसेनेचे मंत्री संतप्त; फडणवीस यांची मध्यस्थी

मुंबई - ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा प्रचार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो न वापरणे, योजनेच्या नावातून ‘मुख्यमंत्री’ हा शब्दच गायब करणे असे अजित पवार गटाकडून केले जात असल्याची तक्रार करत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

अजित पवार गटाकडून या योजनेचा प्रचार करत असताना मुख्यमंत्री शिंदे यांना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याच्या बातम्या गेले काही दिवस येत आहेत. शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, दादा भुसे, तानाजी सावंत यांनी याबद्दल बैठकीत तीव्र नापसंती व्यक्त केली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर होते. मात्र, शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी ‘लाडकी बहीण’चा विषय काढून नाराजीचा सूर लावला. ‘ही योजना महायुती सरकारची आहे, तिन्ही पक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे. असे असताना तो केवळ अजित पवार यांनीच घेतला आणि त्यांच्यामुळेच महिलांना महिन्याकाठी १५०० रुपये मिळत असल्याच्या जाहिराती अजित पवार गटाकडून केल्या जात आहेत, हे योग्य नाही,’ असे म्हणत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी बोलायला सुरुवात केली.

कोण काय म्हणाले... 
महायुतीतील एकाच पक्षाने या योजनेचे श्रेय घेणे योग्य नाही, आम्ही तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आवर्जून उल्लेख करतो, असे शंभूराज देसाई म्हणाले. यावर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले, की आमच्या पक्षाचा श्रेयवादाचा कुठलाही हेतू नाही. कोणाला कमी लेखण्याचा यात हेतू नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मध्यस्थी केली. योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे; तेव्हा या पदाचा उल्लेख योजनेचा प्रचार करताना केला गेला पाहिजे. आपण तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयाचे तिघांनाही श्रेय आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर वादावर पडदा पडला. 

शिरसाट यांची नाराजी 
- शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना श्रेयवादामुळे लोकांमध्ये सरकारबद्दल चांगला संदेश जात नाही. एकवाक्यता दिसत नाही, या शब्दांत नाराजी व्यक्त केली. 
- अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेष पाटील यांनी, तानाजी सावंत आमच्या नेत्यांबद्दल जे चुकीचे बोलले त्याचा खुलासा शिंदेसेनेने आधी करावा, अशी मागणी केली.

१ कोटी ५९ लाख भगिनींना ४,७८७ कोटींचे वाटप
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४,७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. 
जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम   खात्यात जमा करण्यात आली आहे.  या योजनेत अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अर्ज भरताना केलेल्या गैरप्रकाराबद्दल संबंधितास अटक केल्याची माहितीही दिली.

Web Title: How is the credit of Ajit Pawar? Shindesena ministers angry at meeting; Fadnavis' mediation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.