ठाणे : नवीन आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतील मार्गदर्शन केंद्रांवर विद्यार्थी-पालकांनी गर्दी केली होती. मात्र, ही प्रवेशप्रक्रिया अजून किती दिवस सुरू राहणार, अशा शब्दांत त्यांच्यामध्ये प्रवेशप्रक्रियेबद्दल नाराजीचा सूर दिसून येत होता. दहावीचा निकाल लागून आज दोन महिने झाले, तरी अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया अद्यापही सुरू आहे. यापूर्वी दूरच्या महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रिक्त जागा असलेल्या नजीकच्या महाविद्यालयात प्रवेशाची तर ज्यांना विषय किंवा शाखाबदल करायचा आहे, त्यांनाही या विशेष फेरीमध्ये बदल करण्याची संधी आहे. त्यांच्यासाठी शुक्रवारपासून नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड जवळच्या मार्गदर्शन केंद्रांवर दीडशे रुपयात उपलब्ध केले आहेत. ठाण्यात मो.ह. विद्यालय, आनंद विश्व गुरुकुल, शिवाई विद्यालय आणि कौसा येथील शोएब कॉलेज अशी चार मार्गदर्शन केंद्रे असून त्यावर हे नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड द्यायला शुक्रवारपासून सुरुवात झाली. मुख्य म्हणजे ठाण्यासह मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. त्या त्यातही विद्यार्थी आणि पालकांनी केंद्र गाठले. काही केंद्राच्या बाहेर तर सकाळीच भली मोठी रांग लागली होती. (प्रतिनिधी)>सारखे अर्जच भरायचे का?ही नवीन प्रक्रिया अजून किती दिवस सुरू राहणार, त्यामध्ये किती दिवस जाणार, हे व्यवस्थित कळलेले नाही. आम्ही काय सारखे अर्ज भरत राहायचे आणि कट आॅफ चेक करत राहायचे का? यापेक्षा आॅफलाइन प्रवेशप्रक्रिया तरी बरी होती. किमान पहिल्या आॅनलाइन फेरीनंतर तरी आॅफलाइन पद्धतीने प्रवेश द्यायला हवे होते. - अर्पिता गुंजाळ, विद्यार्थिनी>फेऱ्या समजून घेण्यातच जातो वेळ : ही आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया किचकट वाटते. प्रवेशासाठी वेगवेगळ्या फेऱ्या सुरू करतात. आतासुद्धा ही नवीन फेरी काय आहे, ते माहीत नव्हते. या वेगवेगळ्या फेऱ्या समजून घेण्यातच अर्धा वेळ जातो आहे. प्रक्रिया अजून किती दिवस सुरू राहणार आणि मुले कॉलेजमध्ये तरी जाणार कधी?- प्रकाश राजे, पालक>चौकशी आणि लॉगइन पासवर्ड घेण्यासाठी विद्यार्थ्यांची सतत ये-जा सुरू होती. प्रत्येक केंद्रावरून सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी तरी लॉगइन आयडी आणि पासवर्ड घेतले.
अकरावी अॅडमिशन किती दिवस?
By admin | Published: August 06, 2016 3:13 AM