ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 18 - ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील शासकीय तंत्रनिकेतन अर्थात आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे साडेचारशे विद्यार्थांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना एकाच विषयात नापास करण्यात आले आहे. दरम्यान या विद्यार्थांवरील अन्यायाची माहिती मिळताच आ. जितेंद्र आव्हाड यांनी आयटीआयमध्ये जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यावेळी व्यवस्थापनाने सदर विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा तपासण्याचे आश्वासन दिले.
वागळे इस्टेट येथील आयटीआयमध्ये सुमारे पाचशे ते साडे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी या पूर्वीच्या सर्व परिक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मात्र नुकत्याच घेतलेल्या सहामाही परिक्षेत या मुलांना थिअरी या एकाच विषयात नापास करण्यात आले आहे. विशेष म्हणजे केवळ 20 ते 25 विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात प्राचार्यांशी संपर्क साधला असता प्राचार्यांनी सदर विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शैक्षणिक वर्ष धोक्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आपली कैफियत मांडली.
आ. जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ आयटीआयवर धडक दिली. मात्र त्याठिकाणी प्राचार्य उपस्थित नसल्याने आ. आव्हाड यांनी संताप व्यक्त करून प्राचार्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या विद्यार्थ्यांना त्यांचे पेपर पुन्हा तपासून द्यावे, अशी मागणी केली. तसेच सोमवारपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित पवार , नगरसेवक अमित सरय्या आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.