Jayant Patil ( Marathi News ) :शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात घवघवीत यश मिळवलं आहे. पवारांच्या पक्षाने महाराष्ट्रात लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर आज या खासदारांचं अभिनंदन करण्यासाठी शरद पवार यांनी त्यांना मुंबईत बोलावलं होतं. यावेळी नवनिर्वाचित खासदारांचं अभिनंदन करत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षातील संभाव्य इनकमिंगबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. निवडणूक निकालापासून माझा मोबाईलचा वापर वाढलाय, असं त्यांनी म्हटलं आहे.
"उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे १८ ते १९ आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. खरंच हे आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत का?" असा प्रश्न पत्रकारांकडून जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर पाटील म्हणाले की, "रोहित पवार यांना काही बाहेरचे आमदार संपर्क करत असतील. मात्र या विषयावर मला लगेच काही बोलायचं नाही. या आमदारांबाबत मी योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती देईल. तुम्हाला अंधारात ठेवून आम्ही काही करणार नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अजित पवारांच्या पक्षात धाकधूक?
राज्यातील लोकसभेच्या निकालानंतर धास्तावलेले आमदार बाहेर पडण्याच्या भीतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बैठका सुरु केल्या आहेत. त्यांच्या पक्षाचे किमान १० ते १५ आमदार पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे आमदार केव्हाही अजित पवारांची साथ सोडू शकतात, असे या सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे राज्यात लोकसभेनंतर फोडाफोडीच्या राजकारणाचा पुढचा अंक लिहिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता असून सरकारही काहीसे अस्वस्थ झाल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीतही १५ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी नेत्यांकडून करण्यात आली आहे.