महाराष्ट्राच्या राजकारणात यंदाची लोकसभा आणि राजकारण सुवर्णाक्षरांत लिहिले जाणार आहे. दोन प्रादेशिक पक्षांची दोन शकले एकमेकांविरोधात त्वेशाने, अस्तित्वाची लढाई लढत आहेत. अशातच बारामती देशभरात चर्चेचा विषय ठरली असून तिथे नणंद सुप्रिया सुळे आणि वहिणी सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. यात या दोघींची प्रतिष्ठा आहेच परंतु अजित पवार आणि शरद पवार यांच्या अस्तित्वाची लढाई देखील असणार आहे.
सध्याच्या महायुतीतील जागावाटपानुसार अजित पवारांची राष्ट्रवादी चार जागांवर लढत आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागांवर लढत आहे. अशातच एबीपी माझा - सी व्होटरचा फायनल सर्व्हे आला असून यामध्ये महायुती ३० जागा जिंकताना दिसत आहे. तर मविआला १८ जागा दाखविण्यात आल्या आहेत. यामध्ये अजित पवारांच्या किती जागा निवडून येणार याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
अजित पवार यांना चारपैकी शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज या ओपिनिअन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तर शरद पवारांना पाच जागा जिंकता येणार आहेत. म्हणजेच बारामतीत सुप्रिया सुळे या अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव करणार असल्याचा अंदाज आहे. तर शिरुरमध्ये आढळरावांचा अमोल कोल्हे पराभव करणार आहेत.
रायगडमध्ये देखील सुनिल तटकरे यांचा अनंत गीते पराभव करतील असा अंदाज आहे. उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर हे अजित पवार यांच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकंदरीतच अजित पवारांची धाकधूक वाढणार असून महायुती जिंकत असलेल्या ३० जागांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा नसणार असल्याचा हा अंदाज आहे. हा निवडणूक पूर्व अंदाज असून खरा निकाल ४ जून रोजी लागणार आहे.