सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु त्यानंतर पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी तो मागे घ्यावा अशी विनंती केली होती. त्यानंतर शुक्रवारी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. दरम्यान, निवडणुका हा देखील सद्यस्थितीतील राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान आपलं मत व्यक्त केलं.
राज्यात सद्यस्थितीत निवडणुका झाल्या तर किती जागा येतील याचं गणित मांडलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. “महाविकास आघाडी एकत्र राहिली तर १७० ते १८० जागा यायला काहीच अडचण नाही. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी मिळून ९० ते १०० च्या आत राहतील असं वाटतंय,” असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. “नुकत्याच बाजार समितीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी मविआ एकत्र लढली तिकडे मोठा विजय झाला आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्यावर विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकतील. बहुसंख्य ग्रामपंचायतीदेखील महाविकास आघाडीकडेच आहेत. एकजूट ही महाराष्ट्रात मोठी ताकद होतेय किंवा झालेली आहे हे आकडेवारीवरून दिसतंय,” असंही ते म्हणाले.
“काही ठिकाणी तिघांची आघाडी होते काही ठिकाणी होत नाही हा भाग निराळा आहे. पण मतं एकत्र केली तर कार्यकर्त्यांना एकत्र आलो असतो तर बरं झालं असतं असं वाटतं. दुसऱ्या कोणत्याही पक्षाला या समीकरणाशी मुकाबला करणं फार कठीण आहे,” असं पाटील यांनी नमूद केलं.