राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून संपूर्ण ताकद लावून प्रचार केला जात आहे. यातच, महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यालाही सुरुवात झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या (महाविकास आघाडी) जागा वाढतील, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? याची भविष्यवाणीही त्यानी केली. ते माध्यमांसोबत बोलत होते.
महाविकास आघाडीच्या किती जागा येतील? -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह येथे पुन्हा एकदा प्रचार करत आहेत. ते लोकसभेला जेथे जेथे फिरले होते, तेथे पराभव झाला होता, तेच चित्र यावेळीही असेल का? असा प्रश्न केला असता जयंत पाटील म्हणाले, "ते जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या जागा वाढतील." एवढेच नाही, तर 170 ते 180 च्या दरम्यान आमच्या (महाविकास आघाडी) जागा यायला हरकत नाही," असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी, आपला भावी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होतोना बघायला मिळतोय, कसे बघता याकडे? असे विचारले असता, "असे लोक म्हणता, मी आणखी म्हटलेलं नाही," असं एका वाक्यात उत्तर त्यांनी दिलं.
'एक है तो सेफ है' - पंतप्रधान मोदीएससी, एसटी आणि ओबीसी यांच्यात भांडणे लावण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस देशात आणि राज्यात खेळत आहे. हा समाज एकत्र आला तर आपले राजकीय दुकान बंद होईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, असा घणाघाती आरोप करीत 'एक है तो सेफ है', असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचार शुभारंभप्रसंगी दिला.
सावरकर आणि बाळासाहेबांच्या प्रशंसेचे आव्हान - स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठे असतानाही काँग्रेस त्यांची कधीच प्रशंसा करत नाही. त्यामुळे उद्धवसेनेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सार्वजनिक सभेत या दोघांची प्रशंसा करून दाखवावी, असे आव्हान मोदी यांनी दिले.
देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचे आहे - शाह२० तारखेला महाराष्ट्रात मतदान होणार आहे, त्यात तुम्हाला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. मी दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला. जिथे-जिथे गेलो, मग विदर्भ, मुंबई, कोकण, कोल्हापूर, जळगाव उत्तर महाराष्ट्रात गेलो होतो. तेथे महायुती सरकार बनवायचे आहे आणि देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचे आहे, असं विधान भाजप नेते अमित शाह यांनी केले आहे. ते सांगलीतल्या शिराळा येथील सभेत बोलत होते. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.