जम्मू - जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवलं आहे. याठिकाणी फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सनं ४१ जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसनं ६ जागा जिंकल्या. भाजपाने जम्मू काश्मीरात २९ जागा जिंकल्या असून पीडीपीने ४ आणि अपक्ष ७ आमदार निवडून आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ५० वर्षापासून सक्रीय असलेल्या शिवसेना संघटनेने पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते.
महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांचे उमेदवार उतरवले होते. निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०.३ टक्के मते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ०.५ टक्के मते मिळाली आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ९ उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढले होते.
जम्मू काश्मीरात ठाकरेंच्या उमेदवाराला किती मते मिळाली?
डोडा वेस्ट मतदारसंघ - उमेदवार टिळक राज शान - मते १६२जम्मू वेस्ट मतदारसंघ - उमेदवार मिनाश्री चिब्बेर - मते १२६कालाकोट मतदारसंघ - उमेदवार राकेश कुमार - मते १२६बिश्नाह मतदारसंघ - उमेदवार जय भारत - मते ४७५जसरोटा मतदारसंघ - उमेदवार राजेश कुमार - मते १०४रामनगर मतदारसंघ - उमेदवार राज सिंग - मते ७१४उधमपूर ईस्ट मतदारसंघ - उमेदवार साहिल गंडोत्रा - मते ३९७ उधमपूर वेस्ट मतदारसंघ - उमेदवार संजीव कुमार - मते १७०भदरवाह मतदारसंघ - उमेदवार विनोद कुमार - मते १६५
भाजपानं रचला इतिहास
कलम ३७० हटवण्याचा मुद्दा पुढे करत जम्मू काश्मीरात भाजपानं गेल्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केली. मागील निवडणुकीत या राज्यात भाजपानं २५ जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदाच्या निवडणुकीत या जागांमध्ये वाढ झाली आहे. भाजपानं यावेळी २९ जागांवर विजय मिळवला आहे. त्याशिवाय पक्षाच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे २००८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने भाजपा मतदारांच्या संख्येत वाढ होतानाचे चित्र दिसून येत आहे. २००८ साली भाजपाला १२.४५ टक्के मते मिळून ११ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर भाजपाच्या मतांमध्ये वाढ झाली. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी २२.९८ टक्के झाली त्यावेळी जागांच्या संख्येतही दुप्पट वाढ पाहायला मिळाली.