Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme: महायुती सरकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून या योजनेची चर्चा राज्यभर सुरू आहे. विरोधक महाविकास आघाडीचे नेते या योजनेवरून महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. लाडकी बहीण योजनेची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली असून, यामुळे लाखो महिलांना दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे. तसेच या योजनेत नोंदणी केलेल्या महिलांना या योजनेचा आणखी एक हप्ता वितरीत केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली होती. त्यानंतर ज्या महिलांनी अद्यापही या योजनेत अर्ज केले नाहीत. त्यांना या योजनेला आणि निधीला मुकावे लागणार का, असा प्रश्न महिलांना पडला होता. मात्र, या महिलांना आता सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदत ही महिन्याभरासाठी वाढवली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ३१ सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेत नोंदणी करता येणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा किती महिलांना लाभ मिळाला?
मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. महिला व बालकल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा सुमारे १ कोटी ६० लाख भगिनींना लाभ घेतला आहे. तसेच या योजनेसाठी ४ हजार ७८७ कोटींचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार आढळून आले. यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. या योजनेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी आहे. यात कोणीही भ्रष्टाचार केला, तर तो खपवून घेतला जाणार नाही. आरोपींना थेट तुरुंगात टाकले जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.