मुंबई - देशात १९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणी घोषीत करण्यात आली होती. या कालावधीत तुरुंगवास भोगलेल्यांना भाजप सरकारने पेन्शन लागू केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे.
१९७५ ते १९७७ काळात तुरूंगवास भोगलेल्यांची संख्या किती ? त्यांपैकी सध्या हयात किती ? यासोबतच किती जणांना दरमहा ५ हजार आणि कितींना १० हजार रुपये पेन्शन दिली जाते ? याचा सरकारी तिजोरीवर दरमहा आर्थिक भार किती पडतो ? याबाबतची माहिती सरकारकडं उपलब्ध आहे का, असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीचा विरोध करण्यासाठी अनेक लोकांनी तुरुंगवास भोगला होता. त्याकाळी तुरुंगवास भोगलेल्या लोकांना भाजप सरकारने पेन्शन लागू केली आहे. यामध्ये दोन गट करण्यात आले आहेत. एक महिन्यापेक्षा अधिक काळ तुरुंगवास भोगलेल्यांना दरमहा १० हजार आणि एक महिन्यापेक्षा कमी तुरुंगवास भेगलेल्यांना पाच हजार रुपये पेन्शन देण्यात येते.