गेल्या काही दिवासांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ४ रुपयांनी महागले आहे. 80,80,80,80,50,30 असे करत करत तब्बल ४.१० रुपयांची वाढ झाली आहे. आता घरखर्चाचा हिशेब घालताना लोकांची तारांबळ उडत असल्याचे दिसत आहे. हे इंधनाचे दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. बात चली तो कहा तक जाएगी, कोणालाच माहिती नाही, पण काल एका पुणेकराने घातलेला हिशेब सर्वांचे डोळे पांढरे करणारा नक्कीच आहे. पुण्यातील एक कार चालक रविवारी कारची टाकी फुल करण्यासाठी गेला होता. आज करू, उद्या करू असे म्हणत त्याने गेल्या सोमवारपासून आजच्या सोमवारपर्यंत वेळ काढला, हा वेळकाढू पणा त्याला एवढा महागात पडेल याची कल्पना देखील नव्हती. 35 लीटर इंधन टाकीत बसले. त्यासाठी जवळपास 3,379 रुपये खर्च आला. एकदा पेट्रोल पंपावर गेला की टाकी फुल करण्याची सवय अनेकांना असते, म्हणजे पुन्हा पुन्हा तिकडे जाण्याचा प्रश्न येत नाही.
घरी आल्यावर त्याने 35 ला गेल्या सहा दिवसांत वाढलेल्या दराने गुणले आणि हिशेब घातला. त्या पैशांत घरात अडीच लीटर दूध आले असते, असे म्हटले आणि डोक्यावर हात मारून घेतला. 35 * 3.70 रुपयांचे झाले 129.5 रुपये. २५ रुपये दराने अर्धा लीटर दूध पकडले तर अशा पाच पिशव्या आल्या असत्या आणि वर साडे चार रुपये उरले असते. पण नुकसान झालेच. असेच नुकसान अन्य लोकांचेही होत आहे.
ठाकरे सरकारकडून कर कपातीची अपेक्षाच करू नका...
इंधनाचे दर वाढत चालले आहेत आणि राज्य सरकारने दिवाळीतच त्यावरील कर कमी केले नव्हते. देशभरात जवळपास सर्व राज्यांनी हे दर कमी केले होते. केंद्राने कर कमी करताच राज्यांनीही त्याची री ओढली होती. परंतू महाराष्ट्रात कर कमी होणार नाही, असे राज्यकरर्त्यांनी ठणकावून सांगितले होते. यामुळे आताही हे कर कमी करण्याची शक्यता नाहीच आहे. अशामुळे भविष्यात वाढीव दरांपेक्षा अनेकजणांना आताच टाक्या फुल करण्यास सुरुवात केली आहे. असे केल्याने इंधनाच्या मागणीतही देशभरात मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील हे एक उदाहरण होते, परंतू याचा फटका हिशेब घातल्यास तुम्हालाही किती मोठ्या प्रमाणावर बसू शकतो, याची कल्पना येईल. याशिवाय या इंधन दरवाढीने अन्य गोष्टींच्या किंमती वाढतील याचा फटका वेगळाच.