अतुल कुलकर्णी -
मुंबई: देशातील सर्वाधिक ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गापैकी ४४० किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून, त्यापैकी सलग २१० किलोमीटर पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २ मे रोजी होणार आहे. कोणत्याही स्थितीत जून २०२३ रोजी हा संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व महाव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
१) नागपूर ते सेलू बाजार हे २१० किमीचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धीचे आतापर्यंत पूर्ण झालेले कामदेखील देशात सगळ्यात जास्त आहे.२) सेलू बाजार ते मालेगाव या २८ किमीसाठी राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता वापरावा लागेल. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण होईल.२ -अ) मालेगाव ते दुसरबीड हा ८० किमीचा महामार्ग पूर्ण झाला असून दुसरबीड ते सिंधखेडराजा या २० किमीसाठी राष्ट्रीय महामार्गाचा वळणरस्ता वापरावा लागेल.२ -ब) दुसरबीड ते सिंदखेडराजा या २० किमीच्या समृद्धी महामार्गाचा भाग १५ जूनपासून वाहतुकीस खुला होईल.३) सिंदखेडराजा ते वैजापूर हे १५० किमीचे काम पूर्ण झाले आहे.४) पुढे वैजापूर ते शिर्डी ३२ किमीचा वळण रस्ता वापरावा लागणार आहे. हा रस्ता १५ जून रोजी पूर्ण होणार आहे.५) शिर्डी ते सिन्नर हा ४५ किमीचा रस्ता ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे.६) सिन्नर ते इगतपुरी हा ५८ किमीचा रस्ता ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.७) इगतपुरी ते भिंवडी हा ७८ किमीचा रस्ता जून २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्रातच मुंबई- पुणे हा ९४.६ किमी लांबीचा महामार्ग आहे. ज्याचे काम १ जानेवारी १९९८ मध्ये सुरू झाले. काही वळण रस्त्यांसह ते १ डिसेंबर २००० रोजी पूर्ण झाले आणि उर्वरित संपूर्ण काम १ मार्च २००२ रोजी पूर्ण झाले होते.
दिल्ली ते मुंबई आधी नागपूर ते मुंबई पूर्ण हाेणार -देशात दिल्ली ते मुंबई हा १२०० किमीचा महामार्ग होणार आहे. मात्र, त्या आधीच राज्यातील ७०१ किमी लांबीचा महामार्ग पूर्ण होणार आहे.