मुंबई : वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या माजी खासदार आणि भाजपा नेते नीलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना, "आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली होती”, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच आरोपावरून शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी निलेश राणेंचा समाचार घेतला आहे. तुझी उंची किती अन् तू बोलतो किती, असा टोला त्यांनी निलेश राणेंना लगावला आहे.
"स्व. बाळासाहेब स्वातंत्र्य लढ्यात होते का??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजींशी बाळासाहेबांनी मांडवली केली, तो इतिहास लोक विसरलेली नसल्याचं" म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवला होता.
यावर बोलताना खोतकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने यांना सर्व काही मिळाले असून यांचे नाव लौकिक झाले. असे उपरे लोकं खाल्या मिठाला न जागणारे असतात. त्यामुळे अशा लोकांना गद्दाराशिवाय दुसरी उपमाच आशु शकत नाही. तर तुझी उंची किती अन् तू बोलतो किती, असा खोचक टोलाही खोतकर यांनी निलेश राणेंना लगावला.