- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधिमंडळात जीएसटीचे बिल आणण्याआधीच सरकारने या बिलाचा मसुदा ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांना दाखवला. पारदर्शी कारभाराच्या गोष्टी करणाऱ्या स्वाभिमानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे असे घटनाबाह्य सत्ताकेंद्र चालते का? निवडणुकीच्या काळात वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा केली आणि आता मातोश्रीवर जाऊन वाघाला खाऊ घालून आलात, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सरकारवर कडाडून टीका केली. २७ महापालिकांच्या कर्त्याधर्त्यांना बोलावून, त्यांचा एक मेळावा घेऊन तुम्ही सांगितले असते, तर राज्यात सरकार आहे असे वाटले असते, पण तुम्ही मातोश्रीवर गेलात, राज्याचे सरकार बिलांचा मसुदा घेऊन तेथे गेल्याने, राज्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ऐकविले. भाजपाला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मतांची बेगमी हवी आहे, म्हणून हे सगळे चालले आहे, पण त्यामुळे राज्याची प्रतिष्ठा गेली, असेही ते म्हणाले. पाटील यांचे भाषण पहिल्या दिवशी चर्चेचा विषय बनले होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पाटील यांच्या भाषणावर आक्षेप घेतला, तेव्हा ‘खाली बसा, मी तुमची शक्तीच सांगतोय,’ असे पाटील म्हणाले. मुंबई महापालिकेला फक्त ८ टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. मुंबईची वाढ ८ टक्केच होणार, हे कशाच्या आधारे तुम्ही गृहीत धरले, शिवसेनेने जर चांगले काम केले आणि मुंबईची वाढ १५ टक्के झाली, तरी त्यांना ८ टक्केच वाढ देऊन, तुम्ही मुंबई महापालिकेचे नुकसान करत आहात, असे चिमटेही त्यांनी काढले.