मुंबई - जिच्या भरवशावर गणपतीला गावी जाण्याचे प्लॅनिंग केले त्याच एसटीनेगणेशोत्सवाच्या तोंडावर दगा दिल्याने आता गाव गाठायचे कसे, असा प्रश्न कोकणात जाण्यास इच्छुक असलेल्या चाकरमान्यांना पडला आहे. देवाक काळजी, असे म्हणत अनेकांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. एसटी महामंडळाच्या गणपती विशेष गाड्यांमध्ये ४२०० गट आरक्षण आणि ७०० पेक्षा अधिक वैयक्तिक आरक्षणाचा सहभाग आहे. सर्वाधिक गाड्या ४, ५ आणि ६ सप्टेंबरला कोकणात जाणार असल्याने हे आंदोलन असेच सुरू राहिल्यास प्रवाशांना त्याचा फटका बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी जास्त बसण्याची शक्यता आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारातून दुपारच्या सुमारास चिपळूण, रायगड, पेण, मनमाड, श्रीवर्धन गाड्या नियोजित वेळेपेक्षा २ ते ३ तास उशिरा होत्या. त्यामुळे या गाड्यांमध्ये आगाऊ तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांना एसटी स्थानकातच ताटकळत बसावे लागले होते.
आमची मुंबई सेंट्रल आगारातून माणगावसाठी १२:१५ ची बस होती. बराच वेळ थांबूनही बस सुरू नाही. आमच्यासोबत लहान मुले आणि बायका आहेत. आम्ही घरातून खाऊन निघालो होतो. आता आम्हाला खायलाही काही नाही. जर एसटीचा संप असल्याचे अगोदर माहिती असते तर खासगी गाडीने गेलो असतो. - महादेव मोरे, प्रवासी
गावी जाण्यासाठी महिनाभर आधी आम्ही बुकिंग केली होती. असे अचानक संपामुळे आम्हाला वेठीस का धरले जात आहे. त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. - विक्रांत राणे, प्रवासी