- संतोष आंधळे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आपल्याला अनेकवेळा मतदान मोजणीच्या वेळी लक्षात येते की, पहिली मतदान मोजणी टपाल मतपत्रिकांची होणार आहे. त्यानंतर नागरिकांनी ईव्हीएमने केलेल्या मतदानाची मोजणी होत असते. मात्र अनेकवेळा हे टपाल पत्रिका मतदान कसे होते नागरिकांना माहिती नसते. विशेष म्हणजे हे मतदान करणारे मतदार हे निवडणूक कर्तव्यावर, अत्यावश्यक सेवा, लष्करी सेवामध्ये काम करणाऱ्यासाठी असते. त्याकरिता निवडणूक आयोगाचे विविध अर्ज भरावे लागतात.
सर्व्हिस व्होटर लष्करी सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी याना इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टिम, हे संगणकीय मतदान असून त्यांना येणाऱ्या ओटीपीच्या आधारे मतदान करता येते. या अशा पद्धतीने मतदान करणारे २७५ मतदार या मतदारसंघात आहेत.
१२ क्रमांकाच्या अर्जाद्वारे मतदान निवडणूक प्रक्रियेत कर्तव्यावर असणारे कर्मचारी यांचे मतदान १२ क्रमांकाच्या अर्जाद्वारे होते. ते ज्या मतदारसंघात काम करत आहे, त्यांचे मतदान हे त्यांच्या मतदारसंघाबाहेर आणि त्या ठिकाणी ते मतदानासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही. या व्यक्तींना या अर्जाद्वारे टपाल मत पत्रिकेद्वारे मतदान करता येते. पूर्वी त्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर टपाल मतदान पत्रिका जात होती. मात्र ती पद्धत यावेळी बंद केली आहे. त्यांना ज्या ठिकाणी कर्तव्यावर आहे त्याठिकाणी ही त्याच्या मतदारसंघाची टपाल मतदान पत्रिका दिली जाईल. त्यांनी मतदान करून ती मतदान पत्रिका त्या ठिकणी असणाऱ्या पेटीत बंद लिफाफ्यात टाकायची आहे. त्या पत्रिकेवर मतदारसंघाची पूर्ण माहिती असते.
१२ ड क्रमांकाचा अर्ज अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी असून यांचे मतदान हे इतर मतदारसंघात आहेत. मात्र त्यांची सेवा अत्यावश्यक असल्याने या मतदारांना आहे त्या ठिकाणाहून १२ ड अर्जाच्या माध्यमातून मतदान करता येते. त्यांना हे मतदान करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात येऊन मतदान करावे लागते. त्यांना देण्यात आलेली टपाल मतपत्रिका मतदान पेटीत टाकावी लागते.
१२ अ क्रमांकाचा अर्ज यामध्ये निवडणूक प्रक्रियेत काम करणारे कर्मचारी हे मुंबई दक्षिण मतदारसंघातील आहेत. मात्र त्यांना त्याच्या मतदान केंद्रावर जायला मिळत नाही. त्यावेळी त्यांनी कर्तव्यावर असताना तेथील मतदान केंद्रावर राहून मतदान करता येते. त्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्यात येते. ते दाखवून ते मतदान करू शकतात.