शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तत्पूर्वी, खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरून टीका केली होती. यासंदर्भात आता खोक्यांचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीचा जन्म कसा झाला? तेव्हा कुणाला किती खोके दिले होते? असा बोचरा सवाल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.
एका मराठी वृत्तावाहिनीशी बोलताना म्हस्के म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी आपल्या वक्तव्यासंदर्भात स्वतः दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजीनाम्याचा विषय नाही. राष्ट्रवादीने फुसक्या धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये. म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात येऊ देणार नाही. कायदा आणि सूव्यवस्था आहे की नाही? अशी भाषा राष्ट्रवादीने करू नये आणि असा प्रयत्न केला तर राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवली जाईल.
अब्दुल सत्तार यांना आम्ही पाठीशी घालत नाही, पण केवळ राजकारण करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग करू नये. खोके खोके कुणाला बोलत आहात, राष्ट्रवादी पक्षाचा जन्म कशातून झाला? काँग्रेसमधून आमदार आणि खासदार फुटून राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला, तेव्हा कुणाला किती खोके दिले होते? हेही सांगा, असे म्हस्के यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर अजित दादांनी सकाळचा शपथविधी केला, बाकिचे तुमचे आमदाराही त्यावेळी होते. तेव्हा किती खोके घेतले होते? त्यांनी खोके घेतले होते का? याचेही उत्तर राष्ट्रवादी पक्षाने द्यावे, असेही नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.