ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा हद्दपार करण्यासाठी मंगळवारी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याची ऐतिहासिक घोषणा केली. अवैध मार्गाने बक्कळ पैसा कमावणा-यांविरोधात, कर चुकवणा-यांविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारकडून टाकलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे.
जशी या निर्णयाची घोषणा झाली, त्यानंतर काही वेळातच लोकं 'काळा पैसा पांढरा कसा करावा?' (How to convert black money into white money?) याची माहिती शोधण्यासाठी सर्च इंजन गूगलवर तुटून पडल्याचे दिसून आले. पाहता पाहता काळ्या पैशांचा विषय गूगलवर ट्रेंड करू लागला.
दरम्यान, 'काळा पैसा पांढरा कसा करावा?' याची माहिती शोधण्यात गुजरात पहिल्या क्रमांक असून महाराष्ट्र दुस-या आणि हरियाणा तिस-या क्रमांकावर आहे, असा अहवाल 'ब्लूमबर्ग'ने दिला आहे. 'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार 8 नोव्हेंबर रोजी रात्री काळा पैसा पांढरा करण्याविषयीची माहिती सर्वाधिक शोधण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
यावरुन काळा पैसा कमावणा-यांना नोटा बदलताही येत नाहीत आणि पैसा पांढरा करणंही कठीण झाल्याने, अवैध व्यवसाय करणा-यांची सर्व बाजूंनी चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे.
प्रामाणिक लोकं स्वतःच्या प्रामाणिकपणावर संतुष्ट - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री
केंद्र सरकारच्या 500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. भारताची विश्वासहर्ता टिकून राहावी यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. देशाला कॅशलेस अर्थव्यस्थेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे. तसेच प्रामाणिक लोकं स्वतःच्या प्रामाणिकपणावर संतुष्ट आहेत तर अप्रामाणिक लोकं या निर्णयामुळे चिंतेत आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी दिली होती.
नोटा रद्दची घोषणा केल्यानंतर देशभरातील नागरिकांनी 500, 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली आहे. दरम्यान, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणा-यांवर आयकर विभागाची करडी नजर आहे.