मुंबई : भाजपाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तास्थापन करणार नसल्याचे सांगितले. याबाबतची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. यावर शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
भाजपा गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असे सांगत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे राजीनामा देतानाही पुढील जे सरकार बनेल ते भाजपाचेच असणार असा दावा केला होता. तसेच भाजपाचे नेतेही भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत होते. आजच्या माघारीवरून राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असे ते सांगत होते. शिवसेनेला अडीज वर्षांसाठी मुख्यमंत्री पद देण्याचा करार ते पाळणार नाही. सत्ता स्थापनही करणार नाही अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. मग भाजपा मुख्यमंत्री कसा बनवणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर राज्यपालांनी निमंत्रण दिल्यास शिवसेना सत्तास्थापनेचा प्रयत्न करेल, असेही सुतोवाच त्यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे वेट अँड वॉचभाजपाने सत्ता स्थापनेत असमर्थता दाखविल्यानंतर शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. तर तिकडे सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे दिल्लीताल नेते प्रफुल्ल पटेल यांची खलबते झाली. यामध्ये राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भुमिकेत राहणार असल्याचे समजते.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले की, शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार केला जाईल. जोपर्यंत त्यांचा प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आमदारांशीही चर्चा करता येणार नाही. यामुळे पुढील निर्णयही घेता येणार नाही. शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडली पाहिजे, युती तुटल्याची घोषणा त्यांनी करावी. केंद्रात वेगळे आणि राज्यात वेगळे असे राहणे चुकीचे आहे, असे मलिक यांनी सांगितले.
आणखी वाचा...
शिवसेनेकडून जनादेशाचा अपमान, भाजप सरकार स्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील
शिवसेनेच्या हालचालींना वेग; 'राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावे'