- धर्मराज हल्लाळे''बेजुबान को आपके पैसेसे खिलाऊंगा तो मुझे पुण्य कैसे मिलेगा मुझे बस्स दो- तीन हजार दे दो मुझे एक लाख की जरुरत नही है'', असे सांगणारे पक्षीमित्र महेबुब चाचा म्हणजे माणुसकीचा वाहता झरा आहेत.
कष्टाचे काम करुन स्व- कमाईतून दर महिन्याला सहा ते सात हजार रुपये पशू- पक्ष्यांच्या देखभालीवर खर्च करणारे लातूरचे पक्षीमित्र महेबुब चाचा यांचे घर म्हणजे, किलबिलाटाने सजलेले आहे़ पदरमोड करुन ही सेवा करणाऱ्या चाचांना एका दानशुराने एक लाखांची मदत दिली. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दखल घेऊन ही मदत महेबुब चाचापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. ज्यावेळी चाचांना तुमच्या कामाला मदत म्हणून एक लाखांचा धनादेश देत आहोत, असे सांगितले, त्यावेळी ते क्षणार्धात म्हणाले, मी इतक्या पैशांचे काय करु ? मी लहानपणापासून पशू- पक्ष्यांवर जीव लावत आलो. भूकेलेल्याला अन्न द्यावे, तहानलेल्याला पाणी द्यावे, हा माणुसकी धर्म आहे. त्याच भावनेने घरात शेकडो पक्ष्यांची घरटी बनली. रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली. हे सगळे मी माझ्या कष्टाच्या पैश्यातून करतो. जर मी दुसऱ्याचे पैसे घेऊन हे काम करु लागलो तर मला पुण्य कसे मिळेल? हा चाचांचा साधा, सरळ सवाल होता.
पैशाच्या मागे धावणाऱ्या जमान्यात जितके मिळेल तितके कमीच पडते आहे. आणखी द्या, माझे पोट भरले नाही, असेच सांगणारे अवती- भोवती दिसतात. त्यामुळे पैश्याला कोणी नाही म्हणेल हे ऐकणे जरा विचित्र वाटते पण, महेबुब चाचांसारखी माणसे पैशापलिकडे माणूसकी आणि कर्मसिध्दांताला महत्त्व देतात.
''करो मेहरबाने तुम अहेले जमींपर,खुदा मेहरबाँ होगा अर्शे बरी पर''महेबुब चाचांनी हेच आपल्या आयुष्यात अंमलात आणले. रस्त्याने जाताना तहानलेल्या गाढवाला पाणी पाजणारे संत याच भूमीने दिले आहेत. महेबुब चाचाही याच परंपरेतले आहेत. रस्त्याने जाताना गाढवीन आपल्या पिलाला जन्म देत होती. तिचे दोन पाय अडकून बसले होते. दोघांचाही जीव जाणार हे निश्चित होते. अशावेळी महेबुब चाचा त्या प्राण्यावरही निस्सिम दया दाखवितात. तिला पशू रुग्णालयापर्यंत पोहोचवितात. ज्यात गाढवीनीचे प्राण वाचले. सध्याच्या प्रदूषणाने शहरातून पक्षी गायब होऊ लागले आहेत. चिमण्या दिसतच नाहीत. अन्य दुर्मिळ पक्षी तर आता चित्रातच पहावे लागतील. मात्र, एक महेबुब चाचा पक्ष्यांचे एक नव्हे अनेक घरटी बांधतो. आज तिथे शाळांतील मुले नानाविध पक्षी पहायला जातात. लातूर शहराजवळ मळवटीरोडवरील घरासमोर महेबुब चाचांनी येणाऱ्या जाणाऱ्या पशूंच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय केली आहे. सेवाभाव जपणारी अनेक माणसे आहेत. मात्र, त्याबद्दल मिळालेले मोबदलाही न घेणारे महेबुब चाचा एकमेवाद्वितीय आहेत.
शेती, घर, संपत्ती हे सदैव वादाचे विषय होतात. एका घराचे दोन घरे झाली की बघायलाच नको. महेबुब चाचांनी आपले अर्धे घर पक्ष्यांना दिले आहे. आश्चर्य म्हणजे, पक्ष्यांना घराची अधिकृत वाटणीच करुन दिली आहे. अगदी शंभर रुपयांच्या करार पत्रावर. लातूरला २०१६ मध्ये मोठे पाणीसंकट निर्माण झाले. रेल्वेने पाणी आणावे लागले. त्याही दुष्काळजन्य स्थितीत महेबुब चाचांनी कर्ज काढून पशू- पक्ष्यांना पाणी उपलब्ध करुन दिले. त्यापूर्वी २०१४ मध्येही खाजगी कर्ज घेऊन बोअर घेतला होता. याच जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी सोशल मिडियात एक संदेश फिरला. वडिलांच्या निधनानंतरही परदेशातील मुलगा, मुलगी अंत्यविधीलाही आले नाहीत. अन् दुसरीकडे आजाराने त्रस्त असलेले श्वान चाचांनी तीन वर्षांपासून सांभाळले होते. त्याने जेव्हा प्राण सोडले तेव्हा महेबूब चाचा ढसाढसा रडले. विशेष म्हणजे, जे प्राणी एकमेकांचे शत्रू म्हटले जातात, ते चाचांकडे एकत्र नांदतात. मांजर, कुत्रा, मुंगुस, ससा व सर्व प्रकारचे पक्षी एकाच छताखाली नांदतात कोणासाठीही पिंजरा नाही.