मुंबई : औषधांच्या गैर आणि अतिवापरामुळे औषधांना दाद न देण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, पाच वर्षे औषधाच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीला, ६ महिन्यांचा अभ्यासक्रम शिकवून फार्मासिस्टचा दर्जा कसा देण्यात येऊ शकतो? असा सवाल महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस् असोसिएशनने उपस्थित केला आहे. औषधाच्या दुकानात औषधे देण्यासाठी फार्मासिस्ट असणे आवश्यक असल्याचा नियम अन्न व औषध प्रशासनाचा आहे, पण याच नियमाला बगल देत, आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट्स (एआयओसीडी) या व्यापारी संघटनेने पाच वर्षे औषधाच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीला फार्मासिस्ट बनवण्याची मागणी केली आहे. २००८ सालापासून या संघटना ही मागणी करत आहे. २०१३ साली एआयओसीडी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सध्या या संघटनेची मागणी मान्य होण्यासाठी सरकार सकारात्मक पावले उचलत आहेत. असे झाल्यास याचा परिणाम रुग्णांच्या प्रकृतीवर होणार आहे. त्यामुळे सरकारने असा निर्णय घेऊ नये, असे मत महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस् असोसिएशनकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)
‘त्या’ लोकांना फार्मासिस्टचा दर्जा कसा देणार?
By admin | Published: December 22, 2016 4:26 AM