मुंबई : सहिष्णुता आणि ‘स्टार्टअप इंडिया’ अभियान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. एकीकडे देशात असहिष्णुता वाढत असताना हे अभियान चालू शकत नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याची गरज आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’ योजनेची खिल्ली उडविली.मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधींनी शनिवारी विलेपार्ले येथील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज् महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुमारे पाऊण तासाच्या संवादात त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मोकळेपणे उत्तरे देताना प्रलंबित सेवा आणि वस्तू कर (जीएसटी) विधेयक, केंद्र सरकारची कार्यपद्धती आणि काँग्रेसची धोरणे याबाबत सविस्तर विवेचन केले. कृषी क्षेत्राबाबत केंद्र सरकार आपले ‘व्हिजन’ हरवून बसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. कृषी, उद्योग आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या सर्वांचा एकत्र विचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)