विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर-सांगलीत महापुराने होणारे नुकसान टाळण्यासाठी महापुराचे पाणी मराठवाड्यात नेण्याची योजना म्हणजे राज्यकर्त्यांनी दाखवलेले नवे गाजर असल्याची प्रतिक्रिया जलतज्ज्ञांतून व्यक्त झाली. या योजनेची वास्तविकता प्रथम तपासायला हवीच, शिवाय अलीकडील काही वर्षांत मराठवाड्यातही चांगला पाऊस पडून नद्यांना पूर येत आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत कमी दिवसांत प्रचंड पाऊस आणि महापूर हा निसर्गाचा नवा पॅटर्न आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांत दोन-चार लाख क्युसेक्स पाणी कसे व कोणत्या पद्धतीने वाहून नेणार हाच कळीचा मुद्दा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लोकमतने शुक्रवारी यासंदर्भात जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे, जलतज्ज्ञ डॉ. अनिलराज जगदाळे व जल अभ्यासक उदय गायकवाड यांच्याशी चर्चा करून हा विषय समजून घेतला. या सर्वांच्या मते अशा योजनांसाठी होणारा खर्च व त्याची वास्तविकता तपासण्याची गरज आहे. नदीच्या काठावरील अतिक्रमणे, पात्रांचे झालेले आकुंचण, रस्ते बांधताना महापुराचा विचार न होणे अशा गोष्टी महापुरास कारणीभूत आहेत. परंतु त्यासाठी सरकार कांहीच करायला तयार नाही. आणि जे सहजासहजी शक्य होणार नाही ते डोंगरावरील हरणे दाखवून लोकांचे मन वळविण्याचा हा प्रयत्न आहे.आपली शहरे नदीच्या काठी आहेत म्हटल्यावर पूर आपण स्वीकारलाच पाहिजे, परंतु किती वेळात किती पाऊस पडणार, किती पाणी येणार असे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. जपानमध्ये रस्त्याच्या खाली बोगदे खोदले आहेत, महापूर आल्यावर या बोगद्यातून थेट समुद्राला पाणी जाण्याची सोय केली आहे. परंतु त्या सरकारची इच्छाशक्ती, तेवढा निधी आणि प्रकल्प पूर्ण करण्याची हिंमत आपल्या राज्यकर्त्यांत आहे का? याचाही विचार अशा गाजर योजना मांडणाऱ्यांनी करावा, असे या जलतज्ज्ञांना वाटते.
महापूर कालावधी...
कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी वार्षिक पाऊसमान १८०० मिलिमीटर आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे सुमारे २०० टीएमसी पावसाद्वारे पडते. त्यातील सर्व छोटी-मोठी धरणे भरली, तरी कसेबसे १०० टीएमसी पाणीच अडवले जाते. उर्वरित सर्व पाणी वाहूनच जाते. हा पाणी वाहून जाण्याचा कालावधी जास्तीत जास्त सात दिवसांचा आहे.
मूळ योजना अशीगगनबावडा तालुक्यातील खोकुर्ले येथे कुंभी नदीचे ३ टीएमसी पाणी कासारीत वळवायचे. कुंभीचे ३ व कासारीचे ७ असे दहा टीएमसी पाणी वारणेत सोडायचे. वारणेतील ३७ टीएमएसी पाणी मांगले पुलाखालून सापटेवाडी येथे कृष्णा नदीत टाकायचे. कृष्णा-कोयना नदीतील ५१ टीएमएसी व कुंभी-कासारी व वारणेचे ४७ असे ९८ टीएमएसी पाणी नीरा नदीत व तेथून ते भीमा नदीत सोडायचे अशी साधारणत: कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ती मांडली गेली व त्यावेळी त्यासाठी दीड हजार कोटींची तरतूदही करण्यात आली होती.पावसाळा आला की कर घोषणा...
- कोल्हापूर-सांगलीतील महापुराचे पाणी मराठवाड्यातील दुष्काळी भागात नेणार - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- महापूराचे पाणी बोगदा पाडून कृष्णा नदीत नेऊन सोडणार : माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील
- नद्यांच्या पुराचे पाणी शहरात घुसू नये यासाठी भिंत बांधण्याचा विचार : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे