पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाचा पेपर पुन्हा घेण्यात येणार नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी प्रसारमाध्यमांना याबद्दलची माहिती दिली. कालपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. मात्र, अवघ्या चार मिनिटांतच ‘व्हॉटसअॅप’वर व्हायरल झाल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे उघडकीस आला. त्यानंतर इंग्रजीचा पेपर पुन्हा होणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, पेपर सुरू झाल्याच्या दीड तासानंतर हे फोटो बाहेर आल्याने याला पेपर फुटला असे म्हणता येणार नाही. या प्रकरणाची गैरप्रकार म्हणून नोंद घेतली जाईल. या प्रकाराच्या मागे जे आहेत त्यांचा शोध घेतला जाईल. वेळ पडल्यास सायबर पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात येईल. मुलांनी आणि पालकांनी घाबरून न जाता व्यवस्थित परीक्षा द्यावी. हा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही
बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली जात आहे. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. कडक पोलीस बंदोबस्त तसेच भरारी पथकांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असूनही मंगळवारी अवघ्या चार मिनिटांतच इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला. हा प्रकार पेपर संपल्यानंतर उघड झाला होता.