मुंबई : ‘हब मॉल प्रिमायसेस को-आॅप. सोसायटी लि.’ फसवणूक प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात ‘मोफा’ कायद्यांतर्गत बिल्डरविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तपासात पारदर्शकता आणण्यासाठी दहिसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. ‘हब मॉल प्रिमायसेस को-आॅप सोसायटी लि.’ फसवणूकप्रकरणी या सोसायटीचे सचिव प्रवीण अग्रवाल यांनी देशबन्धु गुप्ता, खुशीराम गुप्ता, निलेश गुप्ता आणि लोढा यांच्या विरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात केंद्राशी चर्चा सुरू होती. मात्र गेल्याच आठवड्यात हा तपास वनराई पोलिसांकडून दहिसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या वृत्तास दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांनीही दुजोरा देत पुढील तपास आम्ही करणार आहोत असे सांगितले.वनराई पोलीस तपास करत असताना अचानक हे प्रकरण दहिसर पोलिसांकडे का वर्ग करण्यात आले, याबाबत कोणीही पोलीस अधिकारी बोलण्यास तयार नाही. मात्र स्थानिक पोलीस ठाणे आणि बिल्डर यांचे सबंध चांगले असल्याने तपास योग्य पद्धतीने करण्यात आला नाही, असा आरोप होऊ नये याकरिता तपास वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दहिसर पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून दहिसर पोलिसांनी अद्याप एकाचाही जबाब नोंदवला नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘हब मॉल’चा तपास दहिसर पोलिसांकडे
By admin | Published: August 04, 2016 4:55 AM