शरद पवार आणि अजित पवार यांच्या अस्तित्वाची लढाई आता जनतेच्या दरबारात सुरु झाली आहे. अजित पवारांनी पक्ष काढून घेतल्यानंतर आमदारांसह बरेच कार्यकर्ते, नेते अजित पवारांसोबत गेले होते. परंतू, महायुतीत अजित पवारांची होत असलेली कुचंबना आणि लोकसभेत शरद पवारांनी मारलेली मुसंडी पाहून या नेते, कार्यकर्त्यांमध्ये परतीचा ओघ सुरु झाला होता. अजित पवार वेगळे झाल्यानंतरची ही दुसरी दिवाळी, गेल्या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले नव्हते. परंतू या वर्षीच्या पाडव्याला बारामतीतील गोविंद बागेत तुफान गर्दी पहायला मिळत आहे.
पवार समर्थक राज्यभरातून बारामती मध्ये शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच दिवाळी फराळ करण्यासाठी येत असतात. आज गोविंद बागेत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अजित पवार की शरद पवार असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला होता. कायदेशीर लढाई हरल्यानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेले आहे. पक्ष गेला तरी बऱ्यापैकी कार्यकर्ता शरद पवार यांच्यासोबतच राहिल्याचे या गर्दीवरून दिसत आहे.
आता या दिवाळीला पवार कुटुंबीय एकत्र येणार का, याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी आम्ही एकत्र येणार असे म्हटले आहे. गेल्या वर्षी पुण्यातील प्रतापराव पवारांच्या घरी दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र जमले होते. यावेळी शरद पवार-अजित पवार यांच्यात वाढलेले अंतर दिसून आले होते. अजित पवारांच्या आत्यांनी देखील अजित पवारांना समजविण्याचा प्रयत्न केलेला. आता परिस्थिती बदलली आहे.
अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना लोकसभेला उतरविले होते. आता तर अजित पवारांचा सख्खा पुतण्या शरद पवारांच्या साथीने बारामती विधानसभा निवडणूक लढवत आहे. यामुळे पवार कुटुंबात बऱ्यापैकी दरी निर्माण झालेली आहे. दोन्ही पवार कुटुंब जरी एका कार्यक्रमात एकत्र आले तरी त्यांच्यात फारसा वार्तालाप होणार नाही, अशी परिस्थिती आहे.