निखिल म्हात्रे
अलिबाग - वडखळ ते अलिबाग महामार्गावर शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांची भली मोठी रांग लागली होती. या मार्गावरील अवघ्या 20 मिनिटांच्या प्रवासाला तब्बल दोन दोन तास खोळंबल्याने त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. उन्हाळी सुटीच्या मोसमातील शेवटचा विकेंड असल्याने त्यात जलमार्ग बंद झाल्याने संपूर्ण वाहतुकीचा भार रस्ते वाहतुकीवर आल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.
शनिवारी पर्यटकांनी मोठी गर्दी अलिबाग, मुरुड कडे केली आहे. आपल्या आवडत्या पिकनिक स्पॉट कडे जाण्यास निघालेल्या पर्यटकांनी अलिबाग ते वडखळ रस्ता गजबजला होता. मांडवा ते गेट वे जलवाहतूक देखील बंद झाल्याने अलिबाग पेण मार्गावर प्रचंड वाहतुकीचा ताण पडला. त्यामुळे या मार्गावर 4/5 किलोमिटर पर्यंत वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वडखळ ते अलिबाग या मार्गावर 20 ते 30 मिनिटांचा प्रवासाला वेळ लागतो. मात्र आज या मार्गावरून प्रवास करण्यासाठी तब्बल दोन दोन तास वेळ लागत होता. रस्त्यात मोठ्या प्रमाणावर खोळंबल्याने वाहन चालक तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.
अलिबाग वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी सदर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हळू हळू वाहतूक सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल लाड यांनी दिली.