मुंबई : भारतीय संस्कृतीची बलस्थाने अनेक असून, प्रत्येक धर्म हा सत्य आणि अहिंसेची शिकवण देतो, आयुष्य जगताना मानवी मूल्ये ही महत्त्वाची असून, मानवतावाद हाच भारतीय संस्कृतीचा प्रमुख पाया आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. सायन येथील सोमय्या मैदानावर श्रीमद विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज लिखित ‘मारुं भारत, सारुं भारत’ ग्रंथाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.डॉ. मोहन भागवत म्हणाले की, ‘प्राचीन संस्कृतीचा प्रसार प्रथमत: भारतातच होणे गरजेचे असून, त्यानंतर तो विदेशात करणे गरजेचे आहे. आपल्या देशात विविध धर्म, संस्कृती नांदत असून, हे सर्व धर्म आपणाला सत्य आणि अंहिसेचाच मार्ग दाखवितात. भारतवर्षाला खरोखरच प्रगत बनवायचे असेल, तर प्रथमत: तरुणांनी पुढे आले पाहिजे, असेही भागवत यांनी यावेळी नमूद केले.१ जानेवारीपासून सुरू झालेला हा कार्यक्रम १० जानेवारीपर्यंत रंगणार आहे. ‘मारुं भारत, सारुं भारत’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ््याच्या निमित्ताने सोमय्या मैदानावर मोठे देखावे उभारण्यात आले आहेत, शिवाय नक्षीकामाने सजलेले असे ४०० फूट लांब व ६० फूट उंच असे प्रवेशद्वार येथे उभारण्यात आले आहे. शंखेश्वर तीर्थस्थान, विशाल प्रवचन मंडप, माँ सरस्वती मंदिर, साधू-साध्वीसाठीकुटीर आणि अतिथींच्या भोजन व्यवस्थेसाठी विशाल भोजन मंडप उभारण्यात आलेला आहे.रविवारी सकाळी आठ वाजता झालेल्या कार्यक्रमाला डॉ. मोहन भागवत उपस्थित होते, तर सकाळी दहा वाजता गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल उपस्थित राहिल्या होत्या. श्रीमद विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचा ‘मारुं भारत, सारुं भारत’ हा ३०० वा ग्रंथ असून, हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजी या चार भाषांमध्ये तो प्रकाशित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
मानवतावाद हाच संस्कृतीचा पाया
By admin | Published: January 04, 2016 2:39 AM