विठ्ठल देशमुख
राहेरी (जि. बुलडाणा) : कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचे नातेवाईकही जवळ येत नाहीत. पण दोनदा कोरोना होऊन गेलेल्या व म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या पोलीस मित्रासाठी त्याच्या ११३ क्रमांकाच्या बॅचमधील पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल ३० लाख रुपये जमा करून सहकारी मित्राच्या उत्तम उपचाराची सोय करत त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
ही कहाणी आहे बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भाईदास माळी यांची. मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेले माळी किनगाव राजा ठाण्यात कर्तव्यावर होते. त्यांना कोरोनाचा दोनदा संसर्ग झाला. पण दुर्मीळ बुरशीजन्य आजाराने त्यांना ग्रासले. त्याच्या उपचारासाठी तब्बल ३५ ते ४० लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे समजले, तेव्हा त्यांचे अख्खे कुटुंब हादरले. एवढ्या पैशाचा मेळ जमवायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला. यावेळी त्यांच्या मदतीसाठी धावले ते त्यांच्या ११३ क्रमांकाच्या सिंहस्थ बॅचचे सर्व पोलीस अधिकारी. हां हां म्हणता पैसे गोळा झाले आणि माळी यांच्यावर मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. २०१५-१६मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड होण्यापूर्वी ज्या अभ्यासिकेत अभ्यास करायचे, तेथील सहकाऱ्यांनीही त्यांना मदत केल्याचे त्यांचे बंधू दीपक माळी यांनी सांगितले.
बुलडाणा पोलिसांनीही केली मदतबुलडाणा पोलीस दलातील सहकाऱ्यांनी सुमारे ९० हजार रुपयांची मदत केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांपासून ते पोलीस हेडकॉन्स्टेबलपर्यंतच्या सहकाऱ्यांनी ही मदत केल्याचे किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी सांगितले.
भाईदास माळी यांच्या शस्त्रक्रियेसाठी जवळपास ३२ लाख रुपयांचा खर्च आला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आणखी २० दिवस त्यांना रुग्णालयात थांबावे लागेल. त्यानंतर सुट्टी होईल. सुट्टी झाली तरी किमान तीन महिने त्यांना घरी आराम करावा लागणार आहे. - दीपक माळी, भाईदास माळी यांचे बंधू