मुंबई : ‘स्मार्ट शहरां’च्या धर्तीवर ‘स्मार्ट ग्राम’ योजना राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १०० खेडी स्मार्ट बनविली जातील, या घोषणेचा पुनरुच्चार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच जलयुक्त शिवार योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या गावांना रोख बक्षिसे देण्याऐवजी त्या गावांमध्ये अपारंपरिक ऊर्जा, पाणी, स्वच्छता आणि आरोग्याच्या आधुनिक सुविधा पुरविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. ‘स्मार्टग्राम’ योजनेत नियोजनबद्ध विकास, योग्य सुविधांचे जाळे निर्माण केले जाईल तसेच त्या गावांचे उत्पन्न वाढण्यासाठीच्या योजनाही राबविल्या जातील, असे मुंडे यांनी सांगितले. ‘स्मार्टग्राम’ची घोषणा त्यांनी यापूर्वीही केलेली होती. पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामे निधीअभावी रखडली आहेत. केलेल्या कामांचा पैसा मिळत नसल्याने कंत्राटदारांनी कामे बंद केली आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. मुंडे यांनी मान्य केले की, साधारणत: ८०० कोटी रुपयांच्या कामांसाठी त्यांना पैसा देणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांची आपण स्वत: भेट घेतली असून लवकरच काही निधी मिळेल.पंकजा मुंडे यांनी ग्रामीण रस्ते सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविण्याची घोषणा गेल्या डिसेंबरमध्ये केली होती. तिची सुरुवात अद्याप झालेली नाही. याबाबतची फाइल नियोजन विभागामध्ये असल्याचे त्यांनी मान्य केले. इतर कोणत्याही विभागापेक्षा नियोजन विभाग फाइल पुढे सरकवायला जास्त वेळ घेतो, असा चिमटा त्यांनी काढला. (विशेष प्रतिनिधी)
राज्यात शंभर स्मार्टग्राम!
By admin | Published: August 06, 2015 12:52 AM