ऑनलाइन लोकमत
भंडारा, दि. 22 - शेतक-यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतकºयांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी आले पाहिजे, ही मागणी रेटून धरल्यानंतर जिल्हाधिका-यांनी येण्यासाठी नकार दिला. त्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेलांसह शेतकरी व राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रणरणत्या उन्हात ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी पटेलांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस वाहनात कोंबून अटक केली.
शेतक-यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारला सकाळी ११ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात धरणे देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार प्रफुल पटेल यांनी केले. दुपारी १ वाजता आंदोलनस्थळी आलेले प्रफुल्ल पटेल तब्बल अडीच तास आंदोलनात सहभागी होते. या आंदोलनात भंडारासह गोंदिया जिल्ह्यातून आलेले शेतकरी व कार्यकर्ते रणरणत्या उन्हात टाकलेल्या मंडपात बसून होते. शेतकरी, बेरोजगारांच्या न्यायासाठी आपण आंदोलन करीत आहोत, अशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतक-यांचे निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका खा.प्रफुल पटेल यांनी घेतली. मात्र जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येणार नाहीत याची माहिती तहसिलदार संजय पवार तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.
त्यामुळे दुपारी ३.२५ च्या सुमारास खा. प्रफुल पटेल मंडपातून उठून महामार्गावर आले आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा रोखून धरला. तब्बल ४० मिनीटे ते कार्यकर्त्यांसोबत महामार्गावर बसून होते. जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली होती. जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस प्रशासनाच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी दोनवेळा निर्वाणीचा इशारा देत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची सुचना केली. अंतिम इशाºयानंतर ४ वाजता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून उठवून पोलीस वाहनात कोंबण्यास सुरूवात केली. सर्वात शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी प्रफुल पटेलांना पोलीस वाहनात बसविले. खा. पटेलांसह आंदोलनकर्त्यांना घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालय परिसरातील सभागृहात नेण्यात आले. तिथे सर्वांवर गुन्हे दाखल करून नंतर सुटका करण्यात आली.
शेतक-यांसाठी आंदोलन तीव्र करणार -प्रफुल्ल पटेल
आजचे धरणे आंदोलन हा भाजप सरकारसाठी ट्रेलर होता. आमची संयमता म्हणजे भित्रेपणा समजू नये. आमचा आवाज दडपण्याचा शासन प्रयत्न करीत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आजपासून खºया अर्थाने आंदोलनाला सुरूवात झाली असून येणाºया काळात शेतकरी व बेरोजगारांसाठी हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा गर्भित इशाराही प्रफुल पटेल यांनी यावेळी दिला.
https://www.dailymotion.com/video/x844zcn