औरंगाबाद : रेल्वे परिसरातील पार्किंगसाठी दोन मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविल्याने त्यांच्या आश्रयास असलेले शेकडो पक्षी, त्यांच्या पिल्लांचा सोमवारी दुर्दैवी अंत झाला तर पक्ष्यांची अंडीही फुटली.तोडलेल्या फांद्यांमध्ये अडकून मरण पावलेल्या पक्ष्यांची संख्या मोठी होती. परिसरात मृत पक्ष्यांचा खच पडला होता. पक्षीप्रेमींना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पक्ष्यांना वाचविण्यासाठी ते सरसावले. त्यांनी पिल्लांना व जखमी पक्ष्यांंना पकडून एका ठिकाणी जमा केले. त्यांच्यासाठी पाण्याचीही व्यवस्था केली. त्यामुळे शेकडो बगळ्यांना जीवदान मिळाले. तोडलेल्या झाडांच्या फांद्यांखाली दबून अनेक बगळ्यांची अंडी नष्ट झाली. तसेच अनेक पिल्ले मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडलेली पिल्ले गोळा करताना अनेकजण भावुक झाले होते. साधारणपणे शंभर वर्षांपूर्वीचे हे दोन वृक्ष पक्ष्यांचे विशेषत: बगळ्यांचे आश्रयस्थान बनले होते. बगळ्यांचे शेकडो घरटे या झाडांवर दिसायचे. झाडांच्या खाली पार्किंगमधील वाहनांवर पक्ष्यांची विष्टा पडत असल्याची काही वाहनचालकांची तक्रार केली होती. तर झाडांच्या फाद्यांचा अडथळा येत असल्याने ती तोडण्यात आल्याचे दक्षिण मध्य रेल्वेचे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर के. बापूराव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शेकडो पक्षी मृत्युमुखी, अंडीही फुटली!
By admin | Published: August 18, 2015 1:26 AM