सुनील काकडे,
वाशिम- आधार नोंदणी करताना जन्मतारीख अंदाजे नोंदविण्याचा प्रताप महसूल खात्याने केला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणच्या हजारो लोकांच्या आधारकार्डांवर जन्माचे वर्ष वेगवेगळे आणि सरसकट जन्मतारीख मात्र १ जानेवारीच असल्याचे उघडकीस आले आहे.ग्रामीण भागात प्राधान्याने शेतकरी, शेतमजुरांचे वास्तव्य असून, पीक नुकसान, अपघात विमा, पीक कर्ज आदी कामांदरम्यान या लोकांचा थेट बँकांशी संबंध येतो. त्याठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्डची मागणी केली जाते. आधार नोंदणीसाठी ग्रामीण भागातील अनेक अशिक्षितांना जन्मतारीखच माहीत नसल्याने शासकीय कर्मचारी सरसकट नोंदणी करीत आहेत. मात्र जन्मतारखेचा मेळ बसत नसल्याने संबंधित लाभार्थींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पश्चिम वऱ्हाडात समाविष्ट अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीनही जिल्ह्यांतील शेकडो गावांमधील लाभार्थींच्या आधारकार्डांवरील जन्म तारखेमध्ये प्रचंड घोळ झाला असून, तो दूर करण्यासाठी महसूल विभागाने तात्काळ ठोस पावले उचलावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. (प्रतिनिधी)>हा जन्मतारखेचापुरावा नव्हेयासंदर्भात वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याशी संपर्क साधला असता, अनेकांच्या आधारकार्डांवरील जन्मतारीख चुकल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला; मात्र आधारकार्ड हा जन्मतारखेचा पुरावा नव्हे. त्यामुळे ही बाब फारशी गंभीर नाही, असे ते म्हणाले.