जळगाव : शहरातील सुमारे दीडशे नागरिकांना त्वचा विकाराची लागण झालेली असून उपचारासाठी खाजगी दवाखान्यांमध्ये रूग्णांची रिघ लागली आहे. दूषित पाण्यामुळे शरीराला खाज येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.मंगळवारी शहरातील काही नागरिकांच्या अंगाला खाज येत असल्याचा प्रकार सकाळी घडला. सुरूवातीला नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर मात्र त्रास वाढला. ईश्वर कॉलनी, जोशी कॉलनी, रचना कॉलनी व नाथवाडा या भागातील अनेक जण अंग खाजवून चांगलेच बेजार झाले आहेत. नागरिकांनी उपचारासाठी रूग्णालयांमध्ये धाव घेतली. डॉ.संजय चिंचोले यांच्या दवाखान्यात २५ रूग्ण उपचारासाठी आले होते. डॉ.अग्रवाल यांच्या आणि अन्य खाजगी दवाखान्यांमध्ये सुमारे दीडशे रूग्ण त्वचा विकाराचा उपचार करण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली.
दूषित पाण्याने अंघोळ करणे किंवा ते पाणी पिल्याने पोटात जंतू होतात. त्या जंतूमुळे शरीराला खाज येण्याची शक्यता असते. तसेच पाण्यात शेवाळ किंवा घाण असल्यानेसुध्दा शरीराला खाज येऊ शकते. - डॉ.संजय चिंचोले