प्रमोद सुकरे - कऱ्हाड -सध्या बारावीची परीक्षा सर्वत्र सुरू आहे. विद्यानगरी कऱ्हाडातही २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्राचा पेपर दिला. त्यानंतर संबंधित उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविताना त्यातील दोन गठ्ठ्यांतील पाचशे उत्तरपत्रिका गायब असल्याची चर्चा शिक्षण व टपाल खात्यात दबक्या आवाजात सुरू आहे. सुमारे दोन हजार विद्यार्थी कऱ्हाड, उंब्रज येथे बारावी शास्त्र शाखेची परीक्षा देत आहेत. त्यासाठी शहरातील शिवाजी विद्यालय, टिळक हायस्कूल तर उंब्रजच्या महात्मा गांधी विद्यालयातून ‘कस्टोडीयन’चे काम पाहिले जात आहे. शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारीला शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी कऱ्हाडात भौतिकशास्त्राचा पेपर दिला आणि आता सर्व विद्यार्थी उर्वरित पेपरच्या अभ्यासात मग्न आहेत. परीक्षा विभागानेही झालेल्या पेपरच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे करून ते तपासण्यासाठी टपाल खात्यामार्फत पाठविण्याचा सोपस्कार पूर्ण केलाय; पण कऱ्हाड टपाल कार्यालयात उत्तरपत्रिकांच्या वीस गठ्ठ्यांपैकी दोन गठ्ठ्यांचा मेळच लागत नाहीये. त्यामध्ये सुमारे पाचशे उत्तरपत्रिका असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. संबंधित उत्तरपत्रिका खरोखरच गायब झाल्या असतील तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय, हा प्रश्न आ वासून उभा आहे. अधिकाऱ्यांची टाळाटाळउत्तरपत्रिका गायब झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळावा म्हणून कऱ्हाड टपाल कार्यालयात संपर्क साधला. तेथे रामलिंग राजमाने यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. राजमाने यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी याविषयी एस. डी. फडतरे यांच्याशी बोलण्यास सांगितले. फडतरे यांच्या मोबाइलवर संपर्क केला असता त्यांनी हे काम सहायक अधीक्षक एम. डी. पाटील करीत असल्याचे सांगितले. पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी ‘वरिष्ठांची परवानगी असल्याशिवाय माहिती देऊ शकत नाही,’ असे सांगत मोबाइल बंद केला. टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनी याबाबत उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचे यावरूनच स्पष्ट होते. म्हणे आमच्याकडे ‘पोहोच’ आहे !शुक्रवार, दि. २७ रोजी झालेल्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकांबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ‘आम्ही उत्तरपत्रिकांचे वीस गठ्ठे पुढील कार्यवाहीसाठी टपाल कार्यालयात दिले आहेत. त्याची आमच्याकडे पोहोचही आहे,’ असे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगण्यात आले. मात्र, त्यातील काही उत्तरपत्रिका हरवल्या आहेत का, असे विचारताच त्यांनी उत्तर देणे टाळले.मी खात्यांतर्गत प्रशिक्षणासाठी पुणे येथे काही दिवसांपासून आहे. त्यामुळे दहावी, बारावी परीक्षेची कोणतीही जबाबदारी सध्या माझ्याकडे नाही. त्यामुळे किती परीक्षार्थी आहेत किंवा त्यांच्या पेपरचे काय झाले, याबाबत मला कसलीही माहिती नाही.- रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समितीमी कऱ्हाड येथे टपाल कार्यालयात कार्यरत आहे. परीक्षा विभागाचे काम सध्या आम्ही कऱ्हाडमधून पाहत आहोत; पण आमच्या कामकाजाबाबतची कोणतीही माहिती सातारच्या प्रमुख अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही माध्यमांना देऊ शकत नाही.- एम. डी. पाटील, सहायक अधीक्षक, टपाल कार्यालय
बारावीच्या पाचशे उत्तरपत्रिका गायब !
By admin | Published: March 03, 2015 10:25 PM