युगंधर ताजणे
पुणे : पुण्यातील राधिका दाते - वाईकर यांनी एक एकर जागा चंद्रावर खरेदी केली. तेरा वर्षापूर्वी खरेदी केलेल्या या व्यवहारात आपली फसवणूक झाली असे त्यांचे लक्षात आले. मात्र लुना सोसायटीने फ सवणूकीच्या वृत्ताचे खंडन केले असून 19 पासून चंद्रावरील जमीन विक्रीकरिता खुली असल्याचे आपल्या पत्रात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर प्रसिध्द अभिनेता शाहरुख खान आणि सुशांतसिंग रजपूत यांच्यासह भारतातील अनेक नागरिकांनी चंद्रावर आपली ’’प्रॉपर्टी’’ खरेदी केली आहे,अशी माहिती लुना सोसायटी इंटरनँशनलचे संचालक मायकेल रिकी यांनी पत्राव्दारे कळविली आहे.
‘लोकमत‘ने 14 जानेवारी रोजी ’’पुण्यातील महिलेने चंद्रावर घेतली एक एकर जागा’’ असे वृत्त प्रसिध्द केले. यानंतर ज्या कंपनीच्या माध्यमातून व्यवहार सुरु आहेत त्यांच्याशी ‘‘इ मेलव्दारे’’ संपर्क साधला. त्यात त्यांना चंद्रावर होणा-या जमीन खरेदीविषयीच्या प्रक्रिया, मालकीहक्क, ताबा, याबद्द्ल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तरे देताना रिकी म्हणाले, ज्या महिलेने चंद्रावर जागा खरेदी करताना आपली फसवणूक झाली आहे असे म्हटले आहे ते साफ चुकीचे आहे. आमच्याकडे हजारो व्यक्तींनी आपल्या नावाने चंद्रावर जागा खरेदी केली आहे. ही गोष्ट आमच्या दृष्टीने समाधानकारक आहे. जी कोणी महिला या खरेदीच्या व्यवहारात फसवणूक झाली आहे असे सांगत आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. साधारण 1999 पासून लुना सोसायटी इंटरनँशनल आणि द लुनार रजिस्ट्रीच्या वतीने चंद्रावरील हजारो एकर जागा विक्रीकरिता खुली करण्यात आली आहे. १३ वर्षापूर्वी ज्या महिलेने चंद्रावर जागा खरेदी केली ती आता आपली फसवणूक झाल्याचे सांगत आहे. दुस-या बाजुला इतर अनेकांनी आपल्याला चंद्रावर जागा खरेदी करुन एक आगळ्या वेगळ्या प्रकारची गुंतवणूक करता आली याचा आनंद ते व्यक्त करत आहे.
- लुनार सेटलमेंट अँक्ट १९९९ नुसार चंद्रावर खरेदी विक्री सुरु आहे. त्यात आता ‘‘स्पेस रिसोर्स एक्सप्लोरेशन अँड युटिलायझेशन अँक्ट 2015’’ ची भर पडली आहे. त्यानुसार चंद्रावर जागा खरेदी करणे, तसेच संशोधनाकामी तेथील उपलब्ध साधनांचा उपयोग करणे असे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात जमिनीचा ताबा कधी आणि कसा मिळणार याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाकडे संबंधित सोसायटीकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.
- मायकेल जँक्सननेही खरेदी करुन ठेवली जमीन : किंग आॅफ पॉप या नावाने प्रसिध्द असणारा जगप्रसिध्द गायक मायकेल जँक्सन याने हजारो एकर जागा चंद्रावर खरेदी केली होती. त्याबाबतचाउल्लेख त्याने आपल्या मृत्युपत्रात केला असून आपल्या निधनानंतर ती मुलांच्या नावावर करावी असे नमुद करण्यात आले आहे. जगभरातील मोठमोठे उद्योगपती, व्यापारी चंद्रावर जागा घेण्याकरिता आमच्या कंपनीशी संपर्क साधतात. त्यामागे ‘‘लुना’’ संस्थेला संशोधन व विकासकामी मदत व्हावी. हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
- पोलीसांकडे फसवणूकीची तक्रार : पुणे सायबर क्राईम पोलीसांकडे आपल्या झालेल्या फसवणूकीविषयी तक्रार दिली आहे. याबाबत पोलीसांनी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच कशापध्दतीने व कुणी फसवणूक केली आहे यांच्यापर्यंत पोहचण्यास वेळ लागणार असून त्याची योग्य ती दखल घेतली जाणार आहे. असे तक्रारदार राधिका दाते - वाईकर यांनी सांगितले.
- तक्रारदाराच्या तक्रारीनुसार तपास केला जाईल. मात्र 13 वर्षापूर्वी झालेल्या या प्रकाराची संगणकीय माहिती मिळण्यास थोडा वेळ लागेल. तक्रारदाराने ऑनलाईन पेमेंट केले असेल तर त्यावेळचे ट्रान्झेक्शन तपासणे, त्याची शहानिशा करणे या गोष्टी पाहाव्या लागतील. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास सध्या उपलब्ध असणा-या माहितीचा उपयोग करावा लागेल. - राधिका फडके (पोलीस निरिक्षक, सायबर गुन्हे शाखा)