शिवसेना युवा अधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून जामिनीचा बॉण्ड रद्द करण्याची कारवाई राजकीय दबावातून पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. याचा जाब विचारण्यासाठी शेकडो शिवसैनिक उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर एकत्र आले होते. याप्रकारने परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले असून शिवसैनिकांनी पोलिसांना निवेदन दिले.
उल्हासनगर गोलमैदान परिसरातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी शिवसेना युवा अधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यासह अन्य जणांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. नंतर त्यांची वैयक्तिक बॉण्डवर जामिनावर सुटका केली. दरम्यान शहरात शिवसेना व शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून आमने-सामने उतरल्याचे चित्र आहे. युवाधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यावर २ सप्टेंबर रोजी एक अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा खोटा असून त्याची चौकशी पोलिसांनी करावी. असे श्रीखंडे यांचे म्हणणे आहे. दरम्यान उल्हासनगर पोलीस व सहायक पोलिस आयुक्त कार्यालयातून बाळा श्रीखंडे यांना जामिनीचा बॉण्ड रद्द का करू नये. अशी नोटीस बजावली. शिंदे गटाच्या दबावातून शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. याचा जाब विचारण्यासाठी शेकडो शिवसैनिकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यावर धडक दिली असून यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता.
उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड सुट्टीवर असल्याने, शिवसेना शिष्टमंडळाने राजकीय दबावातून पोलीस अधिकारी शिवसैनिकावर खोटे गुन्हे दाखल करीत असल्याचे निवेदन दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, विभाग प्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिवसेना युवाधिकारी यांच्यावर २ सप्टेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला. त्यातून त्यांचा जामिनीचा बॉण्ड रद्द का करू नये. अशी नोटीस पाठविली. तसेच बॉण्ड रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे संकेत दिले. तर पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता बॉण्ड रद्द करण्याची नोटीस पाठविल्याची प्रतिक्रिया बाळा श्रीखंडे यांनी दिली.